झालं गेलं विसरून अखेर 'युती'वर शिक्कामोर्तब, 45 जागा जिंकणारच!

झालं गेलं विसरून अखेर 'युती'वर शिक्कामोर्तब, 45 जागा जिंकणारच!

युतीच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत तिहेरी सामना रंगणार आहे. युती विरूद्ध आघाडी विरूद्ध वंचित बहुजन आघाडी असा हा सामना असेल.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 18 फेब्रुवारी :  नाही नाही म्हणता म्हणता अखेर भाजप आणि शिवसेना मिळून लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकी एकत्र लढणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा केली. हिंदुत्व, देशावरचं दहशतवादाचं संकट अशा अनेक कारणांचा हवाला देत भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र लढणार असल्याचं दोनही नेत्यांनी सांगितलं. गेली चार वर्ष शिवसेना भाजपवर सातत्याने तुटून पडत होती. तर यापुढे युती नाही शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढणार अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र देशातली बदलती राजकीय स्थिती लक्षात घेऊन भाजप आणि शिवसेनेनं सामंज्यस्याची भूमिका घेतली आणि युतीवर अखेर शिक्कामोर्तब झालं.

लोकसभेत भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढवणार आहे. तर विधानसभेत मित्रपक्षांशी चर्चा झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना अर्ध्या अर्ध्या जागा लढवणार आहेत. युतीत काही अडचणी आल्यास उद्धव ठाकरे आणि अमित शहा त्यावर मार्ग काढतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. विधानसभेत सरकार आल्यास सर्व मंत्रिमंडळात भाजप आणि शिवसेनला सारख्याच जागा मिळतील.

युतीच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत तिहेरी सामना रंगणार आहे. अमित शहा आज दुपारी मुंबईत आले आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर भाजपच्या कोअर कमेटीची बैठक झाली. नंतर भाजपचे प्रमुख नेते आणि मुख्यमंत्री फडणवीस अमित शहांना घेऊन मातोश्रीवर गेले. तिथे उद्धव ठाकरे, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे या चौघा नेत्यामध्ये अंतिम चर्चा झाली. मातोश्रीच्या पहिल्या मजल्यावरच्या हॉलमध्ये या नेत्यांमध्ये चर्चा झाली. ही चर्चा झाल्यानंतर  सर्व नेते वरळीतल्या हॉटेल 'ब्ल्यू सी'वर आले. मातोश्रीवर येताना मुख्यमंत्री, अमित शहा आणि आदित्य ठाकरे हे एकाच गाडीतून हॉटेलवर आले आणि त्यांनी संयुक्त पत्रकार  परिषद घेऊन युतीची घोषणा केली.

असा आहे युतीचा फॉर्म्युला

लोकसभा

एकूण जागा - 48

भाजप - 25  जागा लढणार

शिवसेना - 23 जागा लढणार

विधानसभा

एकूण जागा - 288

मित्रपक्षांची चर्चा करून त्यांच्याशी जागावाटप झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना 50-50 टक्के जागा लढवतील.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवणार.  फक्त निवडणुकीसाठीच नाही तर अनेक व्यापक मुद्यावर आम्ही एकत्र लढणार. राम मंदिर लवकरात लवकर व्हावं ही भाजपचीही भूमिका आहे.

भाजप आणि शिवसेनेची 25 वर्षांची मैत्री. काही मतभेद झाले असले तरी हिंदुत्वाच्या विचारांशी आम्ही बांधील आहोत. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी काही मतभेत झाले होते. मात्र गेली साडेचारवर्ष आम्ही केंद्रात आणि राज्यात एकत्र आहोत.

शेतकरी कर्जमाफी योजनेचा फायदा ज्या शतकऱ्यांना मिळाला नाही. त्यांनाही नव्याने फायदा कसा मिळेल याची काळजी घेणार.

नाणार प्रकल्प आता कोकणात होणार नाही. ज्या ठिकाणी लोकांचा विरोध नसेल त्या ठिकाणी होईल.

काही पक्ष एकत्र येवून राष्ट्रीय स्तरावर महाघाडी तयार करत राष्ट्रीय विचारांना आव्हान देण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे आम्ही एकत्र.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीनंतर जबाबदारीचं वाटपही सम-समान होईल हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

झालं गेलं विसरून जाऊ, पण कटू अनुभव येऊ नये अशी इच्छा आहे.

शहीदांचं बलिदान वाया जाणार नाही. केंद्र सरकार पाकिस्तानला धडा शिकवेल अशी आशा आहे.

देशाच्या व्यापक हितासाठी आम्ही युती केली. कर्जमाफीत काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दूर केल्या जातील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

देशात तातडीने राम मंदिर झालंच पाहिजे. नाणार प्रकल्प ज्या ठिकाणी लोकांना मान्य असेल त्या ठिकाणी व्हावा.

अमित शहा काय म्हणाले?

महाराष्ट्रातल्या 48 पैकी 45 जागा आम्ही जिंकणार आहोत.

भाजप आणि शिवसेनेच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण झाली. केंद्रात आणि राज्यात भाजप आणि शिवसेनेचं सरका यावं ही लोकांची इच्छा आहे.

शिवसेना आणि अकाली दल हे भाजपचे सर्वात जुने सहकारी. आमच्यातले मतभेत आजच, याच टेबलवर दूर झाले. आम्ही आता नव्याने कामाला लागणार आहोत.

राम मंदिर, सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि महत्त्वाच्या मुद्यावर आम्ही एकत्र आहोत.

2014 चं असं होतं जागा वाटप

2014 च्या निवडणूकीत भाजपने 26 तर शिवसेनेने 22 जागा लढवल्या होत्या. लढवलेल्या 26 पैकी भाजपने 23 तर शिवसेनेने 22 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या. महाराष्ट्रातल्या एकूण 48 जागांपैकी भाजप आणि शिवसेनेने तब्बल 41 जागा जिंकल्या होत्या. विरोधकांच्या वाट्याला फक्त 7 जागा आल्या होत्या.

युतीचे शिल्पकार कोण?

आधीच्या काळात प्रमोद महाजनांनी जी भूमिका निभावली ती भूमिका यावेळी देवेंद्र फडणवीसांनी साकारली. उद्धव ठाकरेंनाही मुख्यमंत्र्यांबद्दल आदर आणि विश्वास होता. नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा विश्वास असल्याने मुख्यमंत्रीही शिवसेनेला आत्मविश्वासाने सामोरे जात होते.

सर्व मतभेद मान्य करुनही युती होण्यातच भाजप आणि शिवसेनेचा फायदा आहे हे मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना पटवून देण्यात यश मिळवलं. बदलती परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेना दूर जाणं हे भाजपला परवडणारं नव्हतं. तर स्वबळवर लढलं तर काय होणार याची शिवसेनेलाही पूर्ण जाणीव होती. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच युतीचे मुख्य शिल्पकार ठरले.

प्रशांत किशोर यांची शिष्टाई

मात्र 5 फेब्रुवारीला 'मोतोश्री'वर आलेल्या एका खास पाहुण्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. काळा शर्ट आणि जिन्सची पँट अशा कॅज्युअल वेषात आलेला हा पाहुणा होता प्रशांत किशोर. प्रशांत किशोर हे मातोश्रीवर आले आणि महाराष्ट्रात नव्या राजकीय चर्चेला उधाण आलं होचं  पण त्याचा खुलासा आता झाला आहे.

प्रशांत किशोर हे लोकसभेसाठी शिवसेनेची रणनीती ठरविणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र प्रशांत किशोर यांच्या ट्विट नंतर त्याचा खुलासा झाला आहे. युतीची बोलणी पुढे नेण्यासाठी किशोर हे मातोश्रीवर गेले हे आता स्पष्ट झालं. त्यामुळे युतीच्या चर्चेची गाडी वेगात पुढे गेली आणि या भेटीनंतर अवघ्या 13 दिवसांमध्ये युतीवर शिकामोर्तबही झालं.

भाजपसोबत मतभेद असले तरी  युती करण हेच शिवसेनेच्या फायद्याचं आहे हे किशोर यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंना पटवून दिलं. ते त्या दोघांनाही पटलं त्यामुळे युतीच्या चर्चेची गाडी वेगात पुढे सरकली. त्यामुळे यापुढे एनडीच्या चर्चेत किशोर यांच्या कौशल्याचा भाजपला फायदा होणार आहे.

25 वर्षांची मैत्री

भाजपचे नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी युतीच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका निभावली. जेव्हा केव्हा युतीत कुरबूर व्हायची तेव्हा प्रमोद महाजन थेट मातोश्रीवर जावून बाळासाहेबांना भेटायचे आणि हट्ट धरायचे. युतीत बाळासाहेबांची भूमिका कायम वडिलकीच्या नात्याची होती.

शिवसेना आणि भाजप यांची सर्वात पहिल्यांदा युती ही 1984 च्या लोकसभा निवडणुकीत झाली होती. भाजपच्या कमळ या चिन्हावर शिवसेनेचे मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक यांनी निवडणुक लढवली होती. पण युतीला पराभवाचा सामना करावा लागला होता.  नंतर 1995 मध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा युतीचं सरकार आलं आणि इतिहास घडला.

VIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2019 08:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading