मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि गुणगान मात्र शहंशाहचे?', भाजपने 'त्या' गाण्यावरुन पवारांना डिवचलं

'महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि गुणगान मात्र शहंशाहचे?', भाजपने 'त्या' गाण्यावरुन पवारांना डिवचलं

शरद पवार यांचा फाईल फोटो

शरद पवार यांचा फाईल फोटो

"साडेतीन जिल्ह्याचे अझीम ओ शान शेहेनशाह..", अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. भाजपच्या या टीकेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर देण्यात येतं पाहणं महत्त्वाचं ठरेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 11 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचा आज दिल्लीत राष्ट्रीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला देशभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गेले होते. अतिशय जल्लोषात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान एक गाणं वाजवण्यात आलं. खरंतर ते गाणं खरंच वाजवलं गेलं की नाही याबाबत साशंकता आहे किंवा त्याबाबतची पुष्टी आम्ही करत नाही. पण तसं गाणं संबंधित कार्यक्रमात वाजवलं गेल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. तसेच त्याच गाण्यावरुन भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर त्या गाण्याशी संबंधित व्हिडीओ ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.

महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या राष्ट्रीय अधिवेशनातील आहे, असा दावा करण्यात आला आहे. या अधिवेशनादरम्यान गाणी वाजवण्यात आल्याचं संंबंधित व्हिडीओत दिसत आहे. व्हिडीओत जे गाणं वाजतंय ते 'जोधा अकबर' चित्रपटातील आहे. 'अज़ीम-ओ-शान शहंशाह' असे या गाण्याचे बोल आहेत. पण याच गाण्यावरुन भाजपने राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

('दिल्ली'समोर झुकणार नाही, शरद पवार कडाडले, भाजपवर साधला निशाणा)

"मरहबा जनाब शरद पवार साहब! अज़ीम-ओ-शान शहंशाह. फ़ुरवा रावा, हमेशा हमेशा सलामत रहे। दिल्लीमधली 'शहंशाह' हीच खरी ओळख आहे पवार साहेबांची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर शहंशाहचे गुणगान होत आहे. राज्यात महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि गुणगान मात्र शहंशाहचे?", अशी खोचक टीका भाजपच्या ट्विटर अकाउंटवरुन करण्यात आली आहे.

दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीदेखील ट्विटरवर संबंधित व्हिडीओ ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. "साडेतीन जिल्ह्याचे अझीम ओ शान शेहेनशाह..", अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. भाजपच्या या टीकेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर देण्यात येतं पाहणं महत्त्वाचं ठरेल.

First published:

Tags: BJP, NCP, Sharad Pawar