आमचे उमेदवार पाडण्यासाठी भाजपनेच अपक्ष उभे केले होते, सेनेच्या आमदाराचा खुलासा

आमचे उमेदवार पाडण्यासाठी भाजपनेच अपक्ष उभे केले होते, सेनेच्या आमदाराचा खुलासा

"राज्यभरात जिथे शिवसेनेचे उमेदवार उभे होते, त्यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार उभे केले होते. या अपक्ष उमेदवारांना विजयी करायचं आणि..."

  • Share this:

प्रदीप भनगे, प्रतिनिधी

कल्याण, 19 नोव्हेंबर : राज्यात सत्ता स्थापनेवरून भाजप आणि शिवसेनेत बिनसलं आहे. अखेर एनडीएतून सेना बाहेर पडली आहे. आता सेनेचे आमदार आणि माजी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी 'भाजपने अपक्ष उमेदवार उभे करून मला पाडण्यासाठी प्रयत्न केला होता', असा धक्कादायक खुलासा केला आहे. तसंच नारायण राणे ज्या ज्या पक्षात जात त्यांची सत्ता जाते, असा टोलाही केसरकरांनी लगावला.

सेनेचे आमदार आणि माजी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी कल्याण भागातील नेवाळी आणि 14 गाव परिसरात जाऊन केली शेतीची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपसह नारायण राणेंवर टीका केली.

'माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नींने माझ्याविरोधात प्रचार केला'

मी स्वत: कोकणातून निवडून आलो आहे. परंतु, माझ्याविरोधात भाजपने जोरदार प्रचार केला होता. गोव्यातील भाजपच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने मी महायुतीचा अधिकृत उमेदवार असूनही माझ्याविरोधात प्रचार केला होता. भाजपचे 10 मंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांची पत्नीही माझ्याविरोधात प्रचार करत होत्या, असा गंभीर आरोप केसरकर यांनी केला.

'भाजपने सेनेविरोधात अपक्ष उमेदवार उभे केले'

भाजपने नुसतं माझ्याविरोधातच असं केलं नाही. तर राज्यभरात जिथे शिवसेनेचे उमेदवार उभे होते, त्यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार उभे केले होते. या अपक्ष उमेदवारांना विजयी करायचं आणि त्यांच्या जिवावर सत्ता आणायची अशी भाजपची खेळी होती. अशी खेळी करून शिवसेनेला संपवण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, ती यशस्वी होऊ शकली नाही, असा आरोपही केसरकर यांनी केला.

भाजपची ही खेळी जनतेनंच हाणून पाडली. त्यामुळेच आज भाजपवर अशी वेळ आली आहे, असा टोलाही केसरकर यांनी केला.

नारायण राणे ज्या पक्षात जातात त्यांची सत्ता जाते

नारायण राणे यांचं शिवसेनेसोबत नातं काय आहे, हे भाजपला माहिती होतं. पण तरी सुद्धा राणेंनी पक्षात घेऊन सेनेला संपवण्यासाठी भाजपने ही खेळी खेळली. पण राणेंकडे आता एकच आमदार आहे. त्याची किंमत काय असणार आहे. ते ज्या ज्या पक्षात जातात तिथे सत्ता जाते, बाळासाहेबांनी राणेंनी मुख्यमंत्री बनवलं त्यानंतर आमची सत्ता गेली. नंतर ते काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसची सत्ता गेली, आता ते भाजपात गेले अन् भाजपचीही सत्ता गेली, असं म्हणत केसरकरांनी राणेंची खिल्ली उडवली.

'महाशिवआघाडीबाबत अनुकूल राहा'

ज्याला ज्याला महाराष्ट्राचा अभिमान आहे. त्यांनी या महाशिवआघाडीबाबत अनुकूल राहिले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी समसमान कार्यक्रमाबद्दल आपली भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे हेच अंतिम निर्णय घेतील, तो आम्हाला मान्यच असेल, असंही त्यांनी सरकार स्थापनेबद्दल स्पष्ट केलं.

'नेवाळी परिसरात शेतकरी मदत केंद्र उभारणार'

दीपक केसरकर यांनी नेवाळी आणि 14 गाव परिसरात जाऊन केली शेतीची पाहणी केली. या भागात शिवसेना शेतकरी मदत केंद्र उभारणार असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं. तसंच नेवाळी विमानतळाच्या जागेततील शेतीचे सुद्धा पंचनामे करण्याची मागणी केसरकरांनी केली.

===========================

Published by: sachin Salve
First published: November 19, 2019, 6:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading