राज्यात पुन्हा आंदोलनाचा भडका उडणार, सदाभाऊ खोत यांनी दिली 'दूध बंद'ची हाक

राज्यात पुन्हा आंदोलनाचा भडका उडणार, सदाभाऊ खोत यांनी दिली 'दूध बंद'ची हाक

सर्व दूध उत्पादन शेतकऱ्यांनी या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.

  • Share this:

सांगली, 17 जुलै : कोरोनाच्या संकटामुळे दूध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. दुधाच्या प्रॉडक्ट्ची विक्री 10 ते 15 टक्के पर्यंत खाली आलेली आहे. त्यामुळे दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे वेळेत मिळण्यास अडचणी येत आहेत. तरी राज्य सरकारने दूध उत्पादन शेतकऱ्यांना प्रति लीटर 10 रुपये अनुदान द्यावे अथवा गाईचे दूध प्रति लिटर 30 रुपये दराने खरेदी करावे या सर्व मागण्या घेऊन रयत क्रांती संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम पक्ष व भारतीय जनता किसान मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.

माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनाची घोषणा केली असून 1 ऑगस्ट रोजी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध न घालता सरकारचा निषेध करावा असे आवाहन खोत यांनी केले आहे. 1 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेले आहे. तरी सर्व दूध उत्पादन शेतकऱ्यांनी या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.

महाराष्ट्रात दररोज दुधाचे उत्पादन 1 कोटी 40 लाखाच्या आसपास होत आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यातील सर्व हॉटेल,स्विटहोम, चहा टपरी, डॉमिनोज पिझ्झा अशा प्रकारे दूध व दुधाच्या पदार्थांची विक्री करणारी साधने बंद झालेली आहेत. परिणामी 20 मार्च 2020 पासून पिशवी पॅकिंग दुधाचा खप 30 टक्के ते 35 टक्क्यांपर्यंत खाली आलेला आहे. या सर्व संकटात सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे. त्यामुळे या आंदोलनाची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती सदाभाऊ खोत यानी दिली आहे.

यावेळी खोत यांनी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर सरकारने प्रशासक नियुक्तीचा घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे. सरकारने राजकीय फायद्यासाठी हा निर्णय घेतला आहे. गावातील योग्य व्यक्तीची निवड करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम यांनी कोणते थर्मामीटर लावले आहे, असा प्रश्नही खोत यांनी उपस्थित केला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: July 17, 2020, 2:43 PM IST

ताज्या बातम्या