नाशिक, 15 ऑगस्ट : भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्यालं आलं. यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी पूरग्रस्त भागात सरकार करत असलेल्या कामाबद्दल कौतुक केलं. पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही विखे पाटलांनी निशाणा साधला आहे.
'राज्यात पूर परिस्थिती गंभीर असतानादेखील सरकार चांगलं काम करत आहे. त्यामुळे आम्हीच ज्ञानी आहोत असं कोणी समजू नये,' असं म्हणत राधाकृष्ण विखेंनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांना टोला लगावला.
'पुरामुळं राज्यात शेती आणि पशुधन यांचं मोठं नुकसान झालं आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर इथल्या भागाला हा फटका बसला आहे. पण सगळ्यांनी धीर धरावा. आरोप करणं हे विरोधी पक्षांचं कामच आहे. मीही विरोधी पक्षनेता होतो. मात्र या परिस्थितीत कुणीही राजकारण करू नये,' असं आवाहन विखे पाटलांनी केलं आहे.
थोरातांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी विखेंचे प्रयत्न
राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांचे आणि राजकीय गुरू असलेल्या बाळासाहेब वाघ यांची घरी जाऊन भेट घेतली आहे. तसंच यावेळी विखेंनी नतमस्तक होऊन बाळासाहेब वाघ यांचे आशीर्वाद घेतले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत थोरातांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी विखे आपली सर्व शक्ती पणाला लावणार असल्याचं दिसत आहे.
एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या विखे आणि थोरात यांच्यात आता राजकीय संघर्ष आणखी वाढला आहे. काँग्रेसला उभारी देण्यासाठी थोरातांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आल्यानंतर आता भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांना शह देण्यासाठी त्यांच्या मतदारसंघातच संपर्क कार्यालय सुरू केलं आहे. तसंच थोरात विरोधकांची मोट बांधली आहे.
दौंड : कुरकुंभ MIDC मध्ये केमिकल कंपनीला भीषण आग