पुणे, 29 जानेवारी : भाजप पुणे शहर अध्यक्षपदी माजी आमदार जगदीश मुळीक यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी आयोजित भाजपच्या मेळाव्यात खासदार संजय काकडे, गिरीश बापट आणि चंद्रकांत पाटील यांची राजकीय फटकेबाजी रंगली. या कार्यक्रमात खासदार संजय काकडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतही भाष्य केलं आहे.
'नाना (संजय काकडे) भाऊ (गिरीश बापट )आणि दादा (चंद्रकांत पाटील ) एकत्र आहेत त्यामुळं अजित पवार यांना घाबरण्याचे कारण नाही. 2022 ला 100 नगरसेवक निवडून येतील आणि पुणे पालिकेत पुन्हा भाजपची सत्ता येईल,' असं भाकित भाजपच्या मेळाव्यात खासदार संजय काकडे यांनी केलं आहे.
गिरीश बापटांनीही केली बॅटिंग
संजय काकडे यांनी आपल्या भाषणातून हशा पिकवल्यानंतर गिरीश बापट यांनीही फटकेबाजी केली. 'काकडे यांची कुंडली तपासली पाहिजे ते ज्योतिषी असावेत. ज्योतिषी दोन प्रकारचे असतात... एक कुडमुडे दुसरे पाटी लावणारे..काकडे हे दुसरे आहेत मात्र त्यांनी भाजपची पाटी लावली आहे,' असं गिरीश बापट म्हणाले.
'...म्हणून अमित शहा यांनी मला सहकारमंत्री केले'
चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात भाजप मेळाव्यात साखर कारखानदारीवरून काँग्रेस, राष्ट्रवादीतील नेत्यांवर टोलेबाजी केली आहे. 'सध्याचे मंत्रिमंडळ हे साखर कारखानदारांचे आहे. अजित पवार यांच्याकडे किती कारखाने माहीत नाही, हसन मुश्रीफ, बंटी पाटील, राजेंद्र यड्रावकर यांच्याकडेही कारखाने आहेत. जयंत पाटील यांचे तर पवार यांच्यापेक्षाही जास्त आहेत,' असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसंच माझा मात्र एकही कारखाना नाह. म्हणूनच अमित शहा यांनी मला सहकार मंत्री केलं, असा दावाही पाटील यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.