सिद्धार्थ गोदाम, लातूर 6 जानेवारी : राज्यात भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबात अजुनही संभ्रम आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या टीकेची धार कमी केलेली नाही असं वातावरण असताना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात युती झाली तर ठिक, नाहीतर विरोधियोंको 'पटक' देंगे असा इशारा त्यांनी दिलाय. शहांचा हा इशारा नेमका कुणाला आहे यावर आता चर्चा सुरू झालीय. कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथ कसं जिंकता येईल ते बघावं असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांनी केलं. लातूर इथं पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही युती बाबात एक मोठं विधान केलंय. राज्यात युतीचा निर्णय हा भाजपचे अध्यक्ष अमित शहाच घेतील असं ते म्हणाले. "महाराष्ट्रात युती होणार की नाही याची काळजी कार्यकर्त्यांनी करू नये तर त्यांनी कामाला लागावं. राज्यातल्या 48 पैकी 40 जागा जिंकण्याची तयारी ठेवावी." असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
काय म्हणाले अमित शहा?
युती होईल की नाही त्या विचार करू नका. प्रत्येक बूथ जिंकण्याचा प्रयत्न करा. युती झाली नाही तरीही हरकत नाही विरोधकांचा पराभव करू.
2019 ची तिसरी पानिपतची लढाई आपण हरलो तर इतिहास बदलेल. 2019 काहीही करून जिंकायची आहे...कारण मोदी आपले नेतृत्व करत आहेत.
राहुल गांधींनी आपल्या खानदानाचा इतिहास बघावा त्यानंतर इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करावेत.
राफेल प्रकरणी सुप्रीम कोर्टने चौकशी करण्याची आवश्यकता नाही असं म्हटलं आहे.
भाजपने राज्यात आणि केंद्रात एक पैशाचाही भ्रष्टाचार केला नाही. मोदी गरीब कुटुंबातून आले आहेत तरी ते देशाच्या उच्च पदावर पोहचले आहेत.
जलयुक्त शिवार मुळे महाराष्ट्रातील पाण्याची पातळी वाढली. हे देवेंद्र फडणवीस यांचं यश आहे.
निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची विचारधारा लोकांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. त्यातुनच निवडणुका जिंकता येतात.
जोश मध्ये निवडणूक जिंकता येत नाही तर होश मध्ये निवडणूक लढावी लागते. त्यामुळे कामाला लागा.
विरोधकांना हृदय विकाराचे झटके आले पाहिजे असा विजय 2019 मध्ये भाजपला मिळाला पाहिजे.