बीड, 30 सप्टेंबर : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy to Heavy rainfall in Marathwada) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पाहणी केली आणि त्यानंतर त्यांनी राज्य सरकार आणि पालकमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे यांनी आक्रमक होत बीडचे पालकमंत्री असलेले धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला केला आहे.
बीड जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला रवाना झाले आहेत. केंद्र सरकारकडून मदत येईलच तो विषय वेगळा आहे. पण त्यासोबतच राज्य सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना मदत करुन आपल्या आई-वडिलांची भूमिका बजवावी असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. टीव्ही 9 ने या संदर्भातील वृत्त दिलं आहे.
अतिवृष्टीमुळे परिस्थिती खूपच गंभीर आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जायला हवे आणि नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत बळीराजाला आधार द्यायला हवा. पालकमंत्री धनंजय मुंडे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे रस्त्याच्या कडेने पाहणी करत आहेत. शेतात जाऊन पाहणी करावी असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
पंकजा मुंडेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी
परळीच्या देशमुख टाकळी येथे पंकजा मुंडे यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी या अस्मानी संकटाचा धैर्याने सामना करावा, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची सरसकट भरपाई मिळवून देण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे असं पंकजा मुंडेंनी म्हटलं.
परळीच्या देशमुख टाकळी येथे आज अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली व स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
शेतकऱ्यांनी या अस्मानी संकटाचा धैर्याने सामना करावा,अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची सरसकट भरपाई मिळवून देण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे। pic.twitter.com/UwqsvbxfOx — Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 28, 2021
"राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्याला 50,000 रुपयांची मदत द्या" - राज ठाकरेंची मागणी
वाण टाकळी आणि परिसरात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. या भागाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी पंकजा मुंडे यांनी संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांना नुकसानीची संपूर्ण भरपाई मिळवून देण्याचा विश्वास दिला.
वाण टाकळी आणि परिसरात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.आज या भागाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.याप्रसंगी त्यांना नुकसानीची संपूर्ण भरपाई मिळवून देण्याचा विश्वास दिला. pic.twitter.com/BwUJNredDq
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 28, 2021
"शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढू, धीर सोडू नका" मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी असे निर्देश त्यांनी दिले. काही ठिकाणी पुराच्या पाण्यातून जवानांनी ग्रामस्थांची सुटका केली आहे, तसेच या भागातून लोकांचे स्थलांतर व्यवस्थित व्हावे असेही त्यांनी आज सांगितले. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांशी देखील चर्चा केली असून या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बचाव कार्यावर लक्ष द्यावे तसेच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा असे सांगितले.
नुकसानीचे पंचनामे सुरू करा
सध्या बचाव व तातडीच्या मदत कार्यास वेग द्यावा व महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत असेही निर्देश त्यांनी दिले. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचेही नुकसान झाले आहेत, शेतपिक वाहून गेले आहेत, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नका
निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे, याविषयी विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहचावा तसेच नवीन तारखांबाबत माहिती द्या असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Dhananjay munde, Pankaja munde, Rain