सत्तासंघर्षात भाजपकडून शरद पवारांना राष्ट्रपतीपदाची ऑफर? राजकीय भूकंपाची चर्चा

सत्तासंघर्षात भाजपकडून शरद पवारांना राष्ट्रपतीपदाची ऑफर? राजकीय भूकंपाची चर्चा

शिवसेनेकडून सत्तास्थापनेसाठी या दोन्ही पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. मात्र अशातच आता दिल्लीच्या राजकारणात नवी चर्चा जोर धरत आहे.

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून अभूतपूर्व गोंधळ सुरू आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपचं बिनसलं आणि त्यामुळे निवडणुकीआधी बॅकफूटवर असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आता केंद्रस्थानी आले आहेत. कारण शिवसेनेकडून सत्तास्थापनेसाठी या दोन्ही पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. मात्र अशातच आता दिल्लीच्या राजकारणात नवी चर्चा जोर धरत आहे.

भाजपने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली आहे. तसंच राज्यातील आणि केंद्रातील सरकारमध्ये राष्ट्रवादीला सन्माजनक वाटा देण्याचं आश्वासनही दिलं आहे, असं वृत्त एनडीटीव्ही इंडिया या वृत्तवाहिनीसह इतर काही माध्यमांनी दिलं आहे. या वृत्तामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र राष्ट्रवादीला देण्यात आलेल्या या कथित ऑफरबद्दल अद्यापपर्यंत कोणत्याही नेत्याने अधिकृत भाष्य केलेलं नाही.

शरद पवार भूमिकेवर ठाम

एकीकडे भाजपने महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीला ऑफर दिल्याची चर्चा असताना शरद पवार हे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. त्यामुळे आता आगामी काळात सत्तास्थापनेबाबत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर होणार भेट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. संसद भवनात आज दुपारी साडेबारा वाजता ही भेट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार हे पंतप्रधान मोदींची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत माहिती देण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात यंदा परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने वाढवली पिकं जमीनदोस्त झाली. त्यामुळे बळीराजा सध्या मदतीच्या प्रतिक्षेत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत होत असलेली मोदी-पवार भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्वपक्षीय शिष्टमंडळदेखील नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. यावेळी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी शिष्टमंडळाकडून करण्यात येणार आहे.

VIDEO : पोशिंद्याला जेसीबीनं चिरडलं, तर दुसरीकडे म्हशीला दिलं जीवदान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2019 11:12 AM IST

ताज्या बातम्या