ठाकरे सरकार 5 वर्ष टिकणार, भाजप खासदाराच्या दाव्याने सर्वांच्याच भुवया उचांवल्या!

ठाकरे सरकार 5 वर्ष टिकणार, भाजप खासदाराच्या दाव्याने सर्वांच्याच भुवया उचांवल्या!

खासदार संजय काकडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारबद्दल केलेल्या एका वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

  • Share this:

अद्वैत मेहता, पुणे, 7 डिसेंबर : महाराष्ट्रात शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात ऐतिहासिक आघाडीची सत्ता स्थापन केली आहे. मात्र ही आघाडी टिकणार नाही, सरकार पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करू शकणार नाही, असा दावा भाजपच्या अनेक नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र आता भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारबद्दल केलेल्या एका वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट झाली, गप्पा झाल्या. हे सरकार पाच वर्ष टिकेल, ते टिकलं पाहिजे,' असं खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकीकडे भाजपचे नेते हे सरकार किती काळ टिकेल, असं म्हणत सरकारबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत असताना संजय काकडे यांनी मात्र सरकार टिकावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

अजित पवारांबद्दल काय म्हणाले संजय काकडे?

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या आघाडीच्या सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू होत्या. मात्र अजित पवार यांनी राजकीय भूकंप घडवत भाजपला पाठिंबा दिला. तसंच उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. मात्र त्यानंतर अजित पवार यांचं बंड शांत झालं आणि त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र नंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार यांचा अजूनही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. त्यावर बोलताना संजय काकडे यांनी 'अजित पवार यांचा लगेच मंत्री मंडळात समावेश होईल असे वाटत नाही,' असा अंदाज व्यक्त केला आहे.

संजय काकडेंनी घेतली होती शरद पवारांची भेट

संजय काकडे हे जरी आता भाजपचे सहयोगी खासदार असले तरीही त्यांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतचा संवाद कमी झालेला नाही. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करून भाजपला पाठिंबा दिल्यानंतर त्याच दिवशी संजय काकडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत नक्की कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबतची माहिती समोर आली नाही. मात्र संजय काकडे यांनी लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नंतर तो त्यांनी रद्द केला. या पार्श्वभूमीवर संजय काकडे पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक साधत आहेत का, अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 7, 2019, 9:35 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading