संभाजीराजे छत्रपती भूमिकेवर ठाम! MPSC परीक्षा पुढे ढकला, आंदोलन सुरूच राहाणार

संभाजीराजे छत्रपती भूमिकेवर ठाम! MPSC परीक्षा पुढे ढकला, आंदोलन सुरूच राहाणार

सरकार परीक्षा पुढे ढकलण्यास अनुकूल असून लवकरच सकारात्मक निर्णय देईल

  • Share this:

मुंबई, 8 ऑक्टोबर: कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस पसरत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या परीक्षा (MPSC) काही महिने पुढे ढकलाव्या, या भूमिकेवर भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती ठाम आहेत. मराठा आरक्षणासाठी आमचं आंदोलन सुरूच राहाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा...फक्त खुर्ची टिकवण्यासाठी! 26 हजार कोटींच्या घोटाळ्यात अजित पवारांना क्लीन चिट

खासदार संभाजी राजे यांनी सांगितलं की, MPSC ची गडबड का चालली आहे. जुन्या परीक्षा झाल्या. त्यांची नियुक्ती का होत नाही आहे. 420 नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यापैकी 127 नियुक्त्या या मराठा समाजाच्या आहेत. आमचं म्हणणं सरकारला पटलं आहे. सरकार परीक्षा पुढे ढकलण्यास अनुकूल असून लवकरच सकारात्मक निर्णय देईल, असा विश्वास संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

सरकार सकारात्मक-विनायक मेटे

एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी विनायक मेटेंच्या अध्यक्षतेखाली एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. तब्बल दीड ते दोन तास सुरू असलेल्या या बैठकीतनंतर शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटेंनी माध्यमांशी संवाद साधला.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांसोबत 20 मुद्द्यावर चर्चा झाली. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे विनायक मेटेंनी सांगितले. एमपीएससी परीक्षेबाबत आजच निर्णय घ्यावा लागेल, त्यामुळे पुन्हा बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात येईल, असं चित्र आहे. मात्र जर परीक्षा झाल्याच तर मराठा समाजासाठी मोठा आघात असेल. मराठा आरक्षण व एमपीएससीच्या परीक्षेबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा रविवारच्या ऐवजी पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज रात्री उशिरा पुन्हा एकदा बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये नेमकी बाब स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला दिलेली आश्वासने पाळली नाहीत, आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असताना मुख्यमंत्र्यांनी काहीही केले नाही. याशिवाय मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर पोलीस भरतीचा निर्णय कसा घेतला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. त्याशिवाय विरोधकांकडूनही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला होता. आता एमपीएससीच्या परीक्षा घेण्याबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे लवकरच समोर येईल.

Published by: Sandip Parolekar
First published: October 8, 2020, 9:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या