राज्य घटनेबाबत केलेल्या विधानाबद्दल अखेर संभाजीराजेंकडून खेद व्यक्त, म्हणाले...

राज्य घटनेबाबत केलेल्या विधानाबद्दल अखेर संभाजीराजेंकडून खेद व्यक्त, म्हणाले...

'लोकांच्या भावना दुखावल्या, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. मराठा आरक्षणा बाबत संसदेत घटनादुरुस्ती हाही पर्याय होऊ शकतो असे विद्वान सांगत आहेत'

  • Share this:

मुंबई, 19 ऑक्टोबर : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे.  मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक झालेले भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर राज्यघटनेत बदल करण्याच्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.

संभाजीराजे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून आपल्या विधानाबद्दल अखेर खुलासा केला आहे. 'आताच मी पुरग्रस्त भागाची पाहणी करून मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. आणि मला माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलेल्या बातम्या दिसत आहेत. मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी घटना दुरुस्ती करण्यासंबंधी अभ्यास करणार आहे. मला हे वाक्य बोलायचे होते. चुकून बोलण्याच्या ओघात, घटना 'दुरुस्ती' ऐवजी 'बदल' हा शब्द निघाला असावा' अशी सारवासारव संभाजीराजेंनी केली.

तसंच, 'पत्रकारांनी माझी मूळ भावना समजून न घेता, चुकीच्या पद्धतीने बातम्या लावल्या. त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. मराठा आरक्षणा बाबत संसदेत घटनादुरुस्ती हाही पर्याय होऊ शकतो असे विद्वान सांगत आहेत, आणि मी त्याचा अभ्यास करून पावले उचलणार आहे' असं म्हणत संभाजीराजेंनी खेद व्यक्त केला आहे.

काय म्हणाले होते संभाजीराजे?

भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शनिवारी पंढरपूरच्या महापुराची पाहणी केली होती. त्यवेळी पत्रकारांशी बोलत असताना मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजेंनी राज्य घटनेत बदल करण्याबाबत वक्तव्य केले होते.

'आपण ECBC कायदा तयार केला आहे. मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला मागास असल्याची मान्यता सुद्धा दिली आहे. हायकोर्टानेही या कायद्याला मान्यता दिली. त्यामुळे राज्य सरकारची ही जबाबदारी आहे. जर राज्य सरकारकडून काही घडले नाही. तर  केंद्र सरकारकडून जर राज्य घटना बदलून काही निर्णय घेण्याची प्रक्रिया असेल तर त्यासाठी माझा अभ्यास सुरू आहे' असं संभाजीराजे म्हणाले होते. संभाजीराजेंचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.

दरम्यान, आज तुळजापूरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर दोन्ही राजे आक्रमक झाले आहे, याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, पवार म्हणाले की, 'आम्ही राजेंना सांगणारे कोण? त्यांना कोण प्रश्न विचारणार, जे प्रजेचं काम नाही' असं मार्मिक उत्तर देत पवारांनी टोला लगावला होता.

Published by: sachin Salve
First published: October 19, 2020, 2:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या