शिवसेनेसोबत काडीमोड झाल्यानंतर भाजप थाटणार मनसेसोबत संसार, आज नाशिकमध्ये झाली बैठक

शिवसेनेसोबत काडीमोड झाल्यानंतर भाजप थाटणार मनसेसोबत संसार, आज नाशिकमध्ये झाली बैठक

राज्यातल्या राजकीय घडामोडीत शिवसेना आघाडीसोबत संसार थाटण्याच्या तयारीत असताना कोंडी झालेलं भाजप आता मनसेच्या इंजिनासोबत जाण्याच्या प्रयत्नात आहे.

  • Share this:

नाशिक, 19 नोव्हेंबर : राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांची हातमिळवणी होत असताना महापालिकेच्या पातळीवर राजकारणात वेगळ्याच युतीचे संकेत मिळत आहेत. शिवसेना आघाडीसोबत संसार थाटण्याच्या तयारीत असताना कोंडी झालेल्या भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलं आहे आणि आता मनसेच्या इंजिनासोबत कमळाची युती करण्याच्या ते प्रयत्नात आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी येत्या 22 तारखेला निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मनसेच्या नेत्यांची नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली.

नाशिकच्या मनसे कार्यालयामध्ये भाजप-मनसे यांच्यात महापौर पदाच्या निवडणुकांविषयी चर्चा झाली. त्यामुळे भाजप आणि मनसे असं नवं राजकीय समीकरण आता चर्चेत येत आहे. नाशिक महापालिका महापौर निवडणुकीत मनसेच्या पाठिंब्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. यामध्ये मनसेच्या 5 नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. नाशिक पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे आणि नेते शिवाजी गांगुर्डे हे भाजपचे प्रतिनिधी म्हणून मनसे कार्यालयात चर्चेसाठी गेले होते. या बैठकीनंतर आता भाजप विरुद्ध महाशिवआघाडीमध्ये मनसे कोणाची बाजू घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन महाशिवआघाडी सरकार स्थापन करत आहे. नाशिक महापालिकेतही हाच फॉर्म्युला वापरला जाऊ शकतो. स्पष्ट बहुमत असलं तरी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेनं एकत्रित येऊन भाजपला शह देण्याचं ठरवलं आहे. या चढाओढीत नगरसेवक फुटीचा धोका स्वीकारायला तयार नसल्यानं भाजपने आपल्या नगरसेवकांना सहलीला पाठवलं.

विशेष म्हणजे, भाजपला स्पष्ट बहुमत असतांनाही ही निवडणूक त्यांना जड जात आहे. कारण, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी एक होऊन भाजपला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे भाजप कोणताही धोका पत्करायला तयार नाही. असं असताना भाजपसाठी धोक्याची घंटा म्हणजे भाजपातून राष्ट्रवादी मार्गे शिवसेनेत गेलेल्या बाळासाहेब सानप यांचे 7 नगरसेवक समर्थक हे काही दिवस गायब झाले आहेत. ही शिवसेनेची खेळी असल्याची चर्चा आहे.

बाळासाहेब सानप हे भाजपचे पूर्व नाशिक आमदार होते. परंतु, पक्षांनं तिकीट कापल्याने त्यांनी राष्ट्रवादी उमेदवार म्हणून निवडणूक लढवली पण ते पराभूत झाले. आणि त्यानंतर अवघ्या 8 दिवसांत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सानप यांचा महापालिकेत प्रभाव आहे. त्यामुळे भाजपचे 14 नगरसेवक ते फोडू शकतात.

या सगळ्या राजकीय डावपेचांमध्ये शिवसेना सानप यांचा मोठा उपयोग करून घेऊ शकते. त्यात सध्या युतीमध्ये ठिणगी पडल्याने आता शिवसेना महापौर बसवण्याच्या तयारीत आहे. यासगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्षनेतेपद सध्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष, मनसे यांच्या साथीनं शिवसेनेच्या हालचालींना वेग आला आहे. यात आता बाळासाहेब सानप यांची भूमिका निर्णायक असणार आहे तर गिरीश महाजन यांची कसोटी पहायला मिळणार आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 19, 2019, 5:56 PM IST
Tags: nashik

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading