भाजप-मनसे युतीचं पहिलं पाऊल? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जुळले सूर

भाजप-मनसे युतीचं पहिलं पाऊल? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जुळले सूर

या निवडणुकीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजप-मनसे (BJP-MNS Alliance) युतीचं पहिलं पाऊल पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

  • Share this:

नाशिक, 8 मार्च : नाशिक मनपातील सत्ताधारी भाजपला (BJP) तिजोरीच्या चाव्या मनसेच्या (MNS) मदतीने आपल्याकडे ठेवण्यात यश आलं आहे. स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे गणेश गीते यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने गीते यांची सभापतीपदी वर्णी निश्चित झाली आहे.

या निवडणुकीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजप-मनसे (BJP-MNS Alliance) युतीचं पहिलं पाऊल आणि गिरीश महाजन यांचा करिष्मा पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. स्थायी समिती सभापतो पदासाठी आज अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असताना गीते यांचा एकमेव अर्ज आल्याने गणेश गीते हेच स्थायी समितीचे सभापती निश्चित मानले जात आहेत.

शिवसेनेनं केली होती मोर्चेबांधणी, मात्र मोहीम अयशस्वी...

सुरुवातीला शिवसेनेने सभापती पदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र या प्रक्रियेच्या सुरुवातीलाच किंग मेकरच्या भूमिकेत असलेल्या मनसेने भाजपच्या तंबूत जाणं पसंत केल्याने सेनेच्या आकाक्षांवर पाणी फेरलं गेलं. अशा स्थितीतही सेनेने काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांना घेऊन आपली वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथेही काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पाठ फिरवल्याने अखेर सेनेने या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपाच्या गणेश गीतेंचं नाव निश्चित मानलं जातं आहे.

हेही वाचा - काँग्रेसचं धक्कातंत्र : विधानसभा अध्यक्षपदासाठी पुणे जिल्ह्यातील 'या' नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब?

दरम्यान, नाशिक मनपाच्या या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात भाजप मनसे युतीचं पहिलं पाऊल पडल्याचं बोललं जात आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून अज्ञात वासात गेलेल्या गिरीश महाजनांच्या राजकीय मुसेद्दीगिरीने भाजपला आपला गड राखण्यात यश आलं आहे.

गणेश गीते यांना भाजपच्या सत्ता काळात सलग दुसऱ्यांदा स्थायीच्या सभापती पदाचा बहुमान मिळाल्याने महाजन गटाची पुन्हा एकदा सरशी झाली. दरम्यान या निवडणुकीच्या निकालाची औपचारिक घोषणा उद्या होणार आहे.

Published by: Akshay Shitole
First published: March 8, 2021, 9:20 PM IST

ताज्या बातम्या