मुंबई, 28 जून : राज्यातील ओबीसी आरक्षण (OBC Reservation) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) रद्द केल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झाले असून आरोप-प्रत्यारोपदेखील जोरदार सुरू झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीका करणाऱ्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांवर (Balasaheb Thorat) आता भाजपचे विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शेलक्या शब्दात टीका केली आहे. महसूल मंत्रीपदाच्या रस्सीखेचीमुळे काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा प्यायल्यासारखे बरळू लागले आहेत. मुळात फडणवीसांचे लग्न विदर्भ यात्रेच्या 5 वर्षं आधीच झाले होते, असं म्हणत पडळकरांनी बाळासाहेब थोरातांवर जोरदार टीका केली आहे.
‘महसूल मंत्री’ पदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत... मुळात मा. देवेंद्रजी फडणवीसांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे, याचेही भान यांना राहिले नाही. @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra#MahaVikasAghadi pic.twitter.com/00vKB8Q7G4
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) June 28, 2021
काय आहे वाद?
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ओबीसींचं आरक्षण रद्द करून पुढील कायदेशीर प्रक्रिया होईपर्यंत ते रद्द राहिल, असा निर्णय दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची घोषणा केली. राज्याची सूत्रं भारतीय जनता पक्षाकडं दिली तर दोन ते तीन महिन्यांत ओबीसी आरक्षण मिळवून देतो. जर हे मी करू शकलो नाही, तर राजकारणातून संन्यास घेईन, असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता थोरातांनी फडणवसींच्या वक्तव्याची खिल्ली उडवली होती.
काय म्हणाले थोरात?
फडणवीसांच्या राजकीय संन्यासाच्या वक्तव्यावर जेव्हा महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली, तेव्हा फडणवीसांची वक्तव्यं गांभिर्यानं घेण्याची गरज नसल्याचं सांगत त्यांनी जुन्या वक्तव्यांचा संदर्भ दिला. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असं फडणवीस म्हणाले होते. मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा सोडवू म्हणाले होते. सत्तेसाठी ते काहीही बोलत असतात. त्यांच्यावर काय विश्वास ठेवता, असा सवाल त्यांनी माध्यमांना केला होता. त्यावर आता भाजपकडून पडळकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हे वाचा - शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
ओबीसी आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप
राज्य सरकारनं ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असणारा इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी काहीही पाठपुरावा केला नाही, असा आरोप भाजपनं राज्य सरकारवर केलाय. तर केंद्र सरकारनं हा डाटा असूनही तो जाणीवपूर्वक उपलब्ध करून दिला जात नसल्याचा दावा सरकारनं केलाय. तर राज्य सरकारदेखील स्वतः इम्पिरिकल डाटा गोळा करू शकतं, असं म्हणत भाजपनं आंदोलनाची हाक दिली आहे. भविष्यात ओबीसी आरक्षणावरून असेच आरोप-प्रत्यारोप सुरू राहण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Balasaheb thorat, Devendra Fadnavis, Gopichand padalkar, ओबीसी OBC