पंकजा मुंडेंनंतर ऊसतोड मजुरांसाठी गोपीचंद पडळकर मैदानात, काँग्रेस-राष्ट्रवादीला दिला इशारा

पंकजा मुंडेंनंतर ऊसतोड मजुरांसाठी गोपीचंद पडळकर मैदानात, काँग्रेस-राष्ट्रवादीला दिला इशारा

मागण्या मान्य करा अन्यथा साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

  • Share this:

पंढरपूर, 4 ऑक्टोबर : राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूकदार यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

साखर कारखान्याशी संबधित असलेल्या असंघटित कामगारांना न्याय देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता या प्रश्नात लक्ष घातले आहे. यासाठी त्यांनी सांगली, सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावात ऊसतोड कामगारांच्या बैठका घ्यायला सुरूवात केली आहे. आज मंगळवेढ्यातील नंदेश्वरमध्ये बैठक झाली.

'ऊसतोड मजुराची मजुरी फक्त टनाला 240 रूपये आहे. यामध्ये त्यांचे कुटुंब चालणार कसे? त्यांना मजुरी वाढवून दिली पाहिजे. मुकादमांना 37 टक्के वाढ करावी, तर वाहतूकदारांना 150 टक्के वाढ द्यावी,' अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली आहे. सध्या कोविडचे थैमान आहे. त्यासाठी साखर कारखान्यांकडून कोविड हॉस्पिटल उभारावे. ऊसतोड मजुरांना जर क्वारनटाइन केले तर त्यांना त्या दिवसांची मजुरी द्यावी. तसंच ऊसतोड कामगार महिलांसाठी शौचालयाची उभारणी सुध्दा करणे गरजेचे आहे,' अशा मागण्या आमदार पडळकर यांच्याकडून करण्यात आल्या आहेत.

जर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या साखर कारखानदारी उद्योजकांनी ऊसतोड कामगार, मुकादम आणि वाहतूकदार यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर साखर कारखाने सुरू करू देणार नसल्याचा इशारा आमदार पडळकर यांनी दिला आहे. यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 4, 2020, 10:20 PM IST

ताज्या बातम्या