सातारा, 18 फेब्रुवारी : साताऱ्यातील दोन दिग्गज नेते आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांची कधीकाळी घट्ट मैत्री होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला आणि शशिकांत शिंदे यांच्यासोबत त्यांचा संघर्ष सुरू झाला. मात्रा आता पुन्हा एकदा शिवेंद्रराजेंनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
जावळी तालुक्यातील शेतकरी मेळाव्यात शशिकांत शिंदेंना उद्देशून माझी वाट लावू पाहणाऱ्यांना संपवून टाकण्याची भाषा करणाऱ्या शिवेंद्रराजेंनी आज मात्र मेढा येथील सरपंच-उपसरपंच सत्कार सोहळ्यात यूटर्न मारल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी शशिकांत शिंदे आणि मी एकच आहे हे बाकीच्यांना माहीत नाही, असं म्हणत राजकीय खळबळ उडवून दिली.
'निवडणूक जिंकल्यानंतर कोण कुठं गेलं हे आम्हा दोघांनाही माहीत आहे,' असंही शिवेंद्रराजे सरपंच-उपसरपंच सोहळ्यात म्हणाले. शिवेंद्रराजेंनी शशिकांत शिंदे आणि आपण एकच असल्याचे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा शिवेंद्रराजेंची राष्ट्रवादीमध्ये घरवापसी होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
नेमका कोणत्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये झाला होता वाद?
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्याला भगदाड पडल्याची चर्चा सुरू झाली.
दोन्ही राजेंच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला बळकट करण्याची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर आली.
हेही वाचा - काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात तुफान राडा; मारहाणीचा धक्कादायक VIDEO आला समोर
यामुळे पक्षांतर केलेल्या शिवेंद्रराजे यांच्यासोबत शिंदे यांचा संघर्षही सुरू झाला. याचाच परिणाम म्हणून काही दिवसांपूर्वी शिवेंद्रराजे यांनी शशिकांत शिंदेंविरोधात आक्रमक भाषेत हल्लाबोल केला. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये टोकाचे मतभेद असल्याची चर्चाही सुरू झाली. मात्र आज पुन्हा शिवेंद्रराजेंनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळाला संभ्रमात टाकलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shashikant shinde