अजित पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नितेश राणेंनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा

अजित पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नितेश राणेंनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा

भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

  • Share this:

मुंबई, 1 एप्रिल : कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव आणि त्यामुळे निर्माण झालेली लॉकडाऊनची स्थिती, यामुळे राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयावर टीका झाल्यानंतर ही कपात मागे घेत सरकारी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यांमध्ये देण्यात येईल, अशी भूमिका सरकारने घेतली. मात्र याच मुद्द्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

'पोलीस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय मागे घेतल्याबद्दल अजित पवार साहेब धन्यवाद! अनुभव नेहमीच उपयुक्त असतो आणि आपण हे दाखवून दिलं की राज्य तुम्हीच चालवत आहात. पण काहीजण फक्त फेसबुक लाईव्ह करण्यातच व्यस्त आहेत,' असं म्हणत नितेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

सरकारचा निर्णय आणि यू-टर्न

सरकारचा निर्णय आणि यू-टर्न

सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन कमातीच्या निर्णयावरून राज्य सरकारने यू-टर्न घेतला. शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय रद्द करण्यात आला असून मार्च महिन्याचं वेतन दोन टप्प्यांत देण्यात येणार आहे. कर्मचारी नाराजी नको यासाठी धडाकेबाज अजित पवारांनाही एक पाऊल मागे घ्यावं लागल्याची चर्चा आहे. मात्र यावेळी वेतन कपातीला अजित पवार यांनी केंद्र सरकारला जबाबदार ठरवलं आहे.

‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यासमोरील आव्हाने लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासननिर्णय जारी करण्यात आला असून लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही, सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांचे संपूर्ण देय वेतन दोन टप्प्यात मिळेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिली आहे.

राज्याच्या वित्त विभागाने आज जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यासाठी देय वेतनाच्या 50 टक्के रक्कम पहिल्या टप्यात मिळेल. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन पहिल्या टप्प्यात मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या आणि सेवानिवृत्तीधारकांना पूर्ण वेतन मिळेल. या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. या सर्वांचे उर्वरीत वेतन दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारवर फोडले खापर

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन एकाच टप्प्यात दिले जाते. परंतु, केद्राकडून राज्याला देय असलेली 16 हजार 654 कोटींची थकबाकी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशीही न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम मिळाली असती तर सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन एकाचवेळी देणे शक्य झाले असते, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या संकटाविरुद्ध राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकिय शिक्षण विभाग, पोलिस विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महसुल विभाग. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शासनाची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून त्यांच्या वेतनात कपात करण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. कोरोनाविरोधात लढणाऱ्या शासकीय यंत्रणेचे उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले असून यासंदर्भात कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांचे संपूर्ण देय वेतन दोन टप्यात मिळेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

First published: April 1, 2020, 1:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading