मुंबई, 24 फेब्रुवारी : भाजपा आमदार नितेश राणे यांनी शेतकरी कर्जमाफीवर वेगळी भूमिका मांडल्याचं पाहायला मिळालं. 'कोकणातील शेतकरी 100 टक्के कर्ज भरतात, मग कर्ज भरणारे आणि न भरणारे यांना एक सारखाच न्याय...मग यापुढे शेतकऱ्यांनी कर्ज भरायचीच नाहीत, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
'कर्जाच्या यादीत कोकणातल्या एकही शेतकऱ्याला कर्जमाफी नाही. कारण कोकणात आपले कर्जे 100% भरतात..npa होत नाहीत. कर्ज भरणाऱ्यांना आणि न भरणाऱ्यांना एकच न्याय. मग यापुढे कोकणच्या शेतकऱ्यांनी भरूच नये..तसे ही माफ होणारच आहे..', असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे.
कर्जाच्या यादीत कोकणातल्या 1 ही शेतकऱ्याला कर्जमाफी नाही कारण कोकणात आपले कर्जे 100% भरतात..npa होत नाहीत!!
— nitesh rane (@NiteshNRane) February 24, 2020
मग कर्ज भरणाऱ्यांना आणि न भरणाऱ्यांना एकच न्याय !!
मग यापुढे कोकणच्या शेतकऱ्यांनी भरूच नये..
तसे ही माफ होणारच आहे..
दरम्यान, विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे सरकारने आपली वचनपूर्ती केली आहे. आमचं सरकार केवळ घोषणा करणारं नाही तर योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचं सांगत कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी सोमवारी जाहीर करण्यात आली.
कर्जमाफी झालेल्या पहिल्या यादीत राज्यातील 68 गावातील शेतकऱ्यांची नावे आहेत. सुमारे 9 हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादा भुसे उपस्थित होते. ज्या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता. त्या दोन हजार शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे वळते करण्यात आले आहेत.
प्रत्येक जिल्ह्याची यादी पालकमंत्री यांना सुपूर्द करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. एप्रिल अखेरपर्यंत या योजनांची अमलबजावणी होण्याची शक्यता आहे. 15 हजार 358 शेतकऱ्यांची नाव पहिल्या यादीत आहेत. लवकरच कर्जमाफीचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री लवकरच जाहीर करणार आहेत.