जालना, 18 फेब्रुवारी : जालन्यातील बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यात आमदारांना मास्कचा विसर पडला आणि त्यांनी वरातींसह डिजेच्या तालावर बेभान डान्स केला आहे.
राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. लोकांनी मास्क, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन करावे अशी सूचना वारंवार दिली जात आहे. पण, सर्वसामान्याचं काय तर लोकप्रतिनिधीही शासकीय नियमांची पायमल्ली करत आहे.
भाजपच्या वतीने जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद या ठिकाणी महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांची वीज तोडल्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन पार पडल्यानंतर कुचे हे बदनापूरकडे जात होते. त्यावेळी रस्त्यात एका नवरदेवाची मिरवणूक रस्त्याने जात होती. लोकांनी आमदारसाहेबांना विनंती केली आणि कुचे हे गाडीतून खाली उतरले. नुसते गाडीतून खाली उतरले नाहीतर त्यांनी वरातीमध्ये डीजेच्या तालावर चांगलाच ठेका सुद्धा धरला.
मात्र, जालना जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना त्यांनी मास्क न घालताच नवरदेवाच्या वरातीत डान्स केला. या वरातीत आमदारांनी मास्क घालणं गरजेचं होतं. मात्र, मास्क न घालताच त्यांनी डान्स केल्यानं आमदार साहेबांना कोरोनाचा विसर पडला का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.