भाजपचे आमदार शरद पवारांना भेटले, राष्ट्रवादीच्या दाव्याने राजकीय खळबळ

भाजपचे आमदार शरद पवारांना भेटले, राष्ट्रवादीच्या दाव्याने राजकीय खळबळ

'विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आमच्या काही आमदारांना धमकावून आणि आमिष दाखवून पक्षात घेतलं.'

  • Share this:

मुंबई, 7 डिसेंबर : 'भाजपच्या काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. याआधी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत असलेले आमदार जे सध्या भाजपमध्ये आहेत असे काही आमदार शरद पवार यांच्या भेटीला आले होते,' असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

'विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आमच्या काही आमदारांना धमकावून आणि आमिष दाखवून पक्षात घेतलं. आता ते परत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत येऊ इच्छित आहेत. यावर पक्षाकडून लवकरच निर्णय होईल,' असा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे शरद पवारांना भेटणारे भाजपचे आमदार कोण, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

अजित पवार यांच्याबद्दल भाष्य

सिंचन घोटाळ्यातील काही प्रकरणांत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चिट मिळाली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. '70 हजार कोटीचा सिंचन घोटाळा असल्याचा गाजावाजा भाजपने केला होता. पण एसीबी ने या घोटाळ्यात अजित पवार यांना क्लीन चिट दिली आहे. मात्र 7 वर्ष भाजपनं अजित पवारांना बदनाम केलं. भाजपने खोटा प्रचार केला,' अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

भाजपचे आमदार पक्षांतर करणार असल्याची चर्चा

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला शक्तीहीन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात मेगाभरती केली. मात्र आता याच मेगाभरतीचं भाजपवर बुमरँग होण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे 12 विद्यमान आमदार आणि एक राज्यसभा खासदार सत्ताधारी महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ घडली. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं भाजपला धक्का देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जवळीक केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यामुळे पक्षांतर करून फसलेले आमदार पुन्हा आता सत्ताधारी असणाऱ्या तीन पक्षांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे.

First published: December 7, 2019, 4:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading