मुंबई, 03 फेब्रुवारी : विधान परिषदेच्या पाच जागांचे निकाल लागले. यानंतर विजयी उमेदवारांनी त्यांच्या मतदारसंघात जल्लोषही केला. कार्यकर्त्यांकडूनही मोठा जल्लोष साजरा करत रॅली काढली जात आहे. मात्र यात एका नवनिर्वाचित आमदाराला सेलिब्रेशनचा फटका बसला. कोकण मतदारसंघातून भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले. विजयानंतर रॅलीवेळी त्यांच्या खिशातून पैसे लांबवल्याचा प्रकार घडला आहे.
गर्दीत चोरट्यांकडून पैसे, गळ्यातील सोन्याच्या चेन, पाकिट लांबवण्याचे प्रकार घडतात. आता निवडणुकीनंतर विजयाच्या रॅलीत असा प्रकार घडला आहे. कोकण मतदारसंघात भाजपचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले. त्यांच्या विजयानंतर मोठ्या जल्लोषात रॅली काढली गेली. या रॅलीत म्हात्रेंच्या खिशातले ७५ हजार रुपये चोरट्याने चोरले असल्याचं समोर आलंय.
हेही वाचा : 'भाऊ मुख्यमंत्री, वर्दी उतरवेन', Dream11मध्ये 1 कोटी जिंकलेल्याने दारु पिऊन घातला गोंधळ
म्हात्रे यांनी याबाबतची माहिती मतमोजणी केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. म्हात्रे यांनी म्हटलं की, निवडणुकीची मतमोजणी जिथे होते तिथे कार्यकर्त्यांनी जल्लोषात मला उचलून घेतलं. माझ्याकडे त्यावेळी खर्चासाठी पैसे होते, त्यात मागच्या खिशात २५ हजार तर पुढच्या खिशात ५० हजार असे मिळून ७५ हजार होते. हे पैसे जल्लोष सुरू असताना कुणीतरी लंपास केले.
दोन्ही खिशातले पैसे लंपास झाल्यानंतर कार्यकर्त्यांना अलर्ट केलं. असं काही होईल याची कल्पना नव्हती. कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी आणि इतर खर्चाला मी रक्कम खिशात ठेवली होती अशी माहिती ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.