नवी दिल्ली, 21 जानेवारी : बेळगावमध्ये शिवसेनेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनावर भारतीय जनता पक्षाने जोरदार टीका केली आहे. सीमाप्रश्नावर शिवसेनेची भूमिका दुटप्पी असून शिवसेनेने अगोदर काँग्रेसचा निषेध करावा, असं मत भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केलं आहे. राजधानी दिल्लीमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेनंतर 'न्यूज 18 लोकमत'सोबत खास बातचीत करताना हे मत त्यांनी व्यक्त केले.
'काँग्रेसनं नेहमी सीमाप्रश्नी विरोधी भूमिका घेतली आहे. अरविंद सावंत यांनी प्रथम डी के शिवकुमार यांना प्रश्न विचारून जबाब विचारावा. बेळगाव मुद्यावर भाजप सीमा भागातील मराठी लोकांसोबत आहे. मात्र महाविकास आघाडी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याकरिता या प्रकारच्या आंदोलनाचा घाट रचत आहे,' असा घणाघाती आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात सुरू असलेल्या गोंधळावर बोलताना आशिष शेलार म्हणाले की, एमपीएसच्या भूमिकेला राज्य सरकारचा छुपा पाठींबा आहे का? अभ्यास न करता सरकार कोर्टात गेलं, त्यामुळे मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. सरकारच यासाठी जबाबदार आहे. परीक्षा न देता सरकारला पास व्हायचंय का? असा खरमरीत सवालही शेलार यांनी केला आहे. 'महाविकास आघाडी ही महाभकास आघाडी झालेली आहे. त्यामुळे यासंदर्भात आग वाढविण्याचे काम सरकारने करू नये,' असा सल्ला त्यांनी दिला.
वीज बिलावरून केला हल्लाबोल
वीज बिल वसुलीबाबत महावितरणने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'वीज मोफत देण्याच्या बाता केल्या, आता वसूली केली जात आहे. सरकारची सावकारी वृत्ती दिसून येते आहे. एकीकडे कोरोनाच्या काळात वीज बिल कमी करण्याच्या बाता करायच्या सोबतच ग्रामपंचायत निवडणुकीच्या पूर्वी वीज बिल निशुल्क देण्याचे आश्वासन द्यायचे आणि निवडणुका संपताच विजेचे बिल पाठवायचे असा या सरकारचा ढोंगीपणा आहे,' अशा शब्दांत शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.