Home /News /maharashtra /

भाजपने हत्याकांडात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा संबंध जोडला, पण पालघरमधून समोर आली वेगळीच माहिती

भाजपने हत्याकांडात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा संबंध जोडला, पण पालघरमधून समोर आली वेगळीच माहिती

हिंसक जमावाने पोलिसांच्या गाडी बरोबरच काशिनाथ चौधरींच्या गाडीचीही तोडफोड केल्याची माहिती उघड झाली आहे.

पालघर, 20 एप्रिल : पालघरमधील गडचिंचले गावात जमावाने केलेल्या हल्ल्यात तीन प्रवाशांची निर्घृण हत्या करण्यात आली. यामध्ये दोन साधू असल्याने या घटनेसंदर्भात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. सांबित पात्रा यांनी ट्वीट करत राजकीय आरोप-प्रत्यारोप करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध जोडला. त्यांच्या ट्वीटमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पालघर जिल्हा परिषदेतील समाजकल्याण सभापती काशिनाथ चौधरी यांचा उल्लेख करण्यात आला होता. चौधरी हे जमावाच्या बाजूने तिथं असल्याचं पात्रा यांनी आपल्या ट्वीटमधून सूचित केलं होतं. मात्र आता पालघरमध्ये एक वेगळीच घटना उघडकीस आली आहे. पालघर हत्याकांडाची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे काशिनाथ चौधरी हे पोलिसांसमवेत घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनीही प्रक्षुब्ध जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाने त्यांचेही काहीही न ऐकता उलट त्यांनाच धक्काबुक्की करत त्यांच्या गाडीची तोडफोड केली असल्याचं समोर आलं आहे. यावेळी पोलीस देखील उपस्थित होते. मात्र हिंसक जमावाने पोलिसांच्या गाडी बरोबरच काशिनाथ चौधरींच्या गाडीचीही तोडफोड केल्याची माहिती उघड झाली आहे. काय होता भाजपचा आरोप? पालघरमधील घटनास्थळावरील एक व्हिडिओ ट्वीट करत सांबित पात्रा यांनी व्हिडिओत दिसणारा व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देत भाजपचे राष्ट्रीय सचिव असलेले सुनिल देवधर म्हणाले की, 'स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार तो व्यक्ती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य आहे. त्यांच्यासोबत विष्णू पातरा, सुभाष भावर आणि धर्मा फावर हे सीपीएमचे तीन पंचायत समिती सदस्यही तिथे आहेत.' सुनिल देवधर यांनी ही माहिती देताच सांबित पात्रा यांनी आणखी एक ट्वीट केलं. त्यात त्यांनी म्हटलं की, 'महाराष्ट्र सरकारला याचं उत्तर द्यायला हवं. राष्ट्रवादी आणि सीपीएमचे नेते तिथे काय करत होते? तुम्ही लोक आघाडीचे सरकार चालवत आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही एकमेकांच्या पापांवर पडदा टाकू शकाल. संतांची हत्या की षडयंत्र?' एकूणच पालघरच्या हत्याकांडानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. पण आता ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर जमावासोबत असल्याचा आरोप करण्यात आला होता त्यानेच समोर येत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत असताना लोकांकडून माझ्या गाडीवरच दगडफेक झाली, असा दावा केला आहे. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: BJP, Palghar, Sharad pawar

पुढील बातम्या