लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी
नाशिक, 08 जानेवारी : नाशिक महानगर पालिका निवडणुकीच्या (nashik municipal corporation election) तोंडावर राजकीय वातावरण आतापासूनच तापले आहे. भाजपने (BJP) शिवसेनेचा माजी आमदार फोडला होता. त्यानंतर आता सेनेनं जशास तसे उत्तर देत भाजपचे दोन मोठे नेते गळाला लावले आहे. या दोन्ही नेत्यांचा आज शिवसेनेत (Shivsena) पक्षप्रवेश निश्चित समजला जात आहे. त्याआधी गुरुवारी नाशिकमध्ये दोन्ही नेत्यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली होती.
माजी आमदार वसंत गीते आणि भाजप प्रदेशउपाध्यक्ष सुनील बागुल शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. गुरुवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर होते. रात्री उशिरा वसंत गीते आणि सुनील बागुल यांनी संजय राऊत यांची नाशिकमधील हॉटेल एक्स्प्रेस इन येथे भेट घेतली. त्या भेटीचा व्हिडीओ समोर आला आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे.
त्यानुसार आज संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास सुनिल बागुल आणि वसंत गीते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, या दोन्ही नेत्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, अशी माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीला नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे आणि युवासेनेचे नेते वरूण सरदेसाई देखील उपस्थित होते.
पिल्लांना वाचवण्यासाठी घारीशी भिडली कोंबडी, अक्षरश: पिसंच काढली; VIDEO VIRAL
सुनील बागुल आणि वसंत गीते दोनही नेते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची आज पुन्हा घरवापसी होणार आहे. परंतु, या दोन्ही नेत्यांची घरवापसी जरी असली तरी भाजपला हा मोठा धक्का समजला जात आहे.
पृथ्वीचा वेग वाढला! 24 तासांपेक्षा कमी वेळातल्या फेरीमुळे शास्त्रज्ञही हैराण
मागील महिन्यात माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. सानप यांची जागा भरून काढण्यासाठी शिवसेनेनं आता सुनिल बागुल आणि वसंत गीते यांच्या जागा भरून काढण्याचे ठरवले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.