फडणवीस मारणार एका दगडात दोन पक्षी? विरोधी पक्षनेतेपदासाठी सुरेश धस यांच्या नावाची चर्चा

फडणवीस मारणार एका दगडात दोन पक्षी? विरोधी पक्षनेतेपदासाठी सुरेश धस यांच्या नावाची चर्चा

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका दगडात दोन पक्षी मारणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.

  • Share this:

नागपूर, प्रफुल्ल साळुंखे, 15 डिसेंबर : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे. भाजपसह मित्रपक्षांचे नेतेही या पदावर दावा सांगू लागले आहेत. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका दगडात दोन पक्षी मारणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. कारण भाजपकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सुरेश धस यांच्या नावाचा विचार केला जात आहे.

'संधी मिळाल्यास त्या संधीचं सोनं करू,' असं मत सुरेश धस यांनी व्यक्त केलं आहे. बीड जिल्ह्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीवर आक्रमक अंकुश राहावा म्हणून विरोधी पक्षनेतेपदासाठी सुरेश धस यांच्या नावावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. मात्र भाजपकडून अद्याप कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही.

अजित पवार पुन्हा फॉर्मात... एका दिवसात तब्बल तीन मेळावे, आमदारांना दिला 'दम'

पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा कमबॅक करण्यासाठी पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद हवं आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. तसंच याच काळात पंकजा मुंडे यांचीही पक्षाच्या राज्यातील नेतृत्वावरील नाराजी जाहीरपणे समोर आली. त्यामुळे पंकजा मुंडे यांचे पंख छाटण्यासाठी बीड जिल्ह्यातीलच दुसऱ्या नेत्याला पुढे आणण्याची खेळू खेळण्यात येऊ शकते, असं म्हटलं जात आहे.

'...म्हणून मला विरोधी पक्षनेते'

विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते पद कोणाला मिळणार? यावर चर्चा सुरू असतानाच शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी या पदावर दावा सांगितला आहे. भाजपनं मला मंत्रिपद दिलं नव्हतं, म्हणून आता मला विरोधी पक्ष नेतेपद द्यावं, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे. बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि विनायक मुंडे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात मुंडे-मेटेंमध्ये वारंवार खटके उडत असतात. या पार्श्वभूमीवर विनायक मेटे यांनी विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला आहे.

महादेव जानकरही आग्रही

'घटक पक्षाला विरोध पक्षनेतेपद द्यायचा निर्णय झाला तर मी खरा दावेदार आहे,' अशी भूमिका रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी घेतली आहे. भाजपने हे पद स्वतःकडे ठेवलं तर हरकत नाही, पण घटक पक्ष म्हणून माझाच विचार भाजपने करावा, अशी जानकर म्हणाले. एकंदरीत राज्यात सत्ता गमावल्यानंतर आता विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून भाजपमध्येच संघर्ष होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2019 04:55 PM IST

ताज्या बातम्या