मुंबई, 2 फेब्रुवारी : भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या भेटीमुळे तर्क-वितर्क लढवले जात असतानाच आता सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत: याबाबतचा खुलासा केला आहे.
'माझ्या जिल्ह्यातील कामांसाठी मी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. चंद्रपूर विमानतळ, कृषी क्षेत्र, विजेच्या संदर्भात चर्चा झाली. राजकीय चर्चा करण्यासारखं वातावरण सध्या नाही. या भेटीत सकारात्मक राजकीय चर्चा झाली असती तरी ती नागरिकांच्या हिताची असेल ना.. मग अडचण काय आहे?' असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीवर भाष्य केलं.
'ही भेट सार्वजनिक कामासाठी होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला', असं सांगायलाही मुनगंटीवार विसरले नाहीत.
हेही वाचा -नवी मुंबई निवडणुकीत भाजप-मनसे युती होणार? थेट नाईक कुटुंबातील व्यक्तीनेच दिलं उत्तर
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तेत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष टोकाला गेला आहे. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं पाहायला मिळतं. मात्र आता मुनगंटीवार यांच्यासारख्या भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमधील ही कटूता दूर होणार का, हे पाहावं लागेल.
अर्थसंकल्पावरही केलं भाष्य
मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत माहिती देत असताना सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पावर होणाऱ्या टीकेलाही उत्तर दिलं आहे. ' इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्याला अधिक निधी उपलब्ध आहे. त्या राज्याचं नाव वाचलं हे खरं आहे पण त्यांना निधी फारसा काही दिला नाही. या बजेटमधून महाराष्ट्राला खूप काही मिळालं आहे. काही जण गैरसमज पसरवत आहेत. केंद्राने विविध माध्यमातून राज्याला मदत केली आहे. अर्थसंकल्प मांडण्याची केवळ पद्धत बदलली आहे,' असं स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.