मुंबई, 16 डिसेंबर: आता सरकार पडेल, तेव्हा सरकार पडेल, असा वारंवार दावा विरोधी पक्ष भाजपनं केला होता. मात्र, महाविकास आघाडी सरकारने नुकतीच वर्षपूर्ती साजरी केली, असं सांगत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक राजकीय बॉम्ब फोडला आहे.
पुढील चार महिन्यात भाजपचे अनेक आमदार महाविकास आघाडीच्या गोटात सामील होतील, असा गौप्यस्फोट करून अजित पवार यांनी राजकीय धुराळा उडवून दिला आहे. त्यावर भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे. एवढंच नाही तर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना चॅलेंज दिलं आहे. तुमचं डोकं फुटेल पण आमचा एकही आमदार फुटणार नाही, असं मुनगंटीवार यांनी दावा केला आहे.
हेही वाचा...भाजप नगरसेवकांचा भरसभेत राडा! शिवसेना-राष्ट्रवादीच्या सदस्य आले हेल्मेट घालून
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महाविकास आघाडीनं 12 महिन्यात एकही भाजपचा आमदार फोडला नाही. मार आम्हाला नेहमी चॅलेंज देत होते आमदार फोडू, त्याचं काय झालं? असा सवाल देखील मुनगंटीवार यांनी केला आहे.
ते म्हणाले, आम्ही तुम्हाला चॅलेंज देतो जे आमदार तुमच्याकडे येणार आहेत. त्यांच्यासोबत आम्ही तुमची बैठक लावून देतो. तुमच्यात हिंमत असेल तर फोडून दाखवा. तुमच डोकं फुटेल पण आमचा एकही आमदार फुटणार नाही, असंही मुनगंटीवार यांनी जयंत पाटील यांना रोखठोक सांगितलं आहे.
सेटिंगच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते एक नंबर...
सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह महाविकास आघाडीवरही तोंडसुख घेतलं आहे. ते म्हणाले, हे सरकार नेहमी तर्कशून्य निर्णय घेत आलं आहे. महाशिव आघाडी ते महाविकास आघाडी जो प्रवास केला आहे, त्याची या सरकारलाच चिंता वाटते आहे. कोरोनापेक्षा सर्वांत धक्कादायक असा लोकशाहीसाठी निर्णय आहे. सेटिंगच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते एक नंबरचे आहे. तिघेही एकत्र आल्यामुळे त्याचा फटका कोणत्या तरी एका पक्षाला नक्की बसणार आहे, असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.
काय म्हणाले होते जयंत पाटील?
विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं घवघवीत यश मिळवल्यानंतर नेत्याचा आत्मविश्वास वाढला आहे. आता पुन्हा एकदा मेगाभरतीची चर्चा रंगली आहे. भाजपचे काही नेते आणि आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची शक्यता आहे. आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यापाठोपाठ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा 'लवकरच' मेगाभरती होईल, असे संकेत दिले आहेत.
हेही वाचा...मुंबईतील वाकोला परिसरातून प्रवास करताय तर सावधान! धक्कादायक घटना आली समोर
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपमध्ये गळती लागली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि बीडमध्ये राष्ट्रवादीने भाजपला दणका दिला आहे. गेले काही दिवस अनेक सदस्य चर्चा करत आहे. हाताच्या दोन्ही बोटापेक्षा जास्त सदस्य भाजपमध्ये नाराज आहेत आणि त्यांना उबग आलेली आहे, त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे, लवकर निर्णय घेतला जाईल' असे संकेत जयंत पाटील यांनी दिले.