'आपला काळा झालेला चेहरा गोरा होतो का, यासाठी काँग्रेसचे प्रयत्न', दानवेंची खोचक टीका

'आपला काळा झालेला चेहरा गोरा होतो का, यासाठी काँग्रेसचे प्रयत्न', दानवेंची खोचक टीका

रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • Share this:

लातूर, 4 ऑक्टोबर : 'आपला काळा झालेला चेहरा गोरा होतो का, यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत,' असं म्हणत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसला कोपरखळी लगावली आहे. 'गर्दीत तोल सांभाळता आला नाही म्हणून राहुल गांधी पडले,' असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर युपी पोलिसांनी ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळलं, त्यावरून देशभरात संताप व्यक्त करण्यात आला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेत पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. मात्र ही भेट घेण्यापूर्वी त्यांना उत्तर प्रदेशातील पोलिसांशी संघर्ष करावा लागला. यावेळी राहुल आणि प्रियंका यांना धक्काबुक्कीही झाली. याविषयीच बोलताना रावसाहेब दानवे यांनी तिरकस भाष्य केलं आहे.

आपल्या खास शैलीत कोपरखळ्या लगावण्यासाठी आणि वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी लातुरात देखील काँग्रेसवर खरपूस टीका केली आहे. रावसाहेब दानवे हे आज लातूर जिल्ह्यात होते. यावेळी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. पत्रकार परिषदेत बोलताना रावसाहेब दानवे यांनी कृषी विधेयकावरून काँग्रेसवर टीका करत आजपर्यंत मोदींविरोधात मुद्दा मिळाला नाही त्यामुळं आपलं झालेलं काळं तोंड कुठे पांढरं होत आहे का, यासाठी काँग्रेस प्रयत्न करत असल्याचा टोला लगावला आहे .

यासोबतच राहुल गांधींना कोणीही पाडलं नाही. त्यांना मोठ्या गर्दीची सवय नसल्यानं तोल जाऊन ते स्वतःच पडले, असंही दानवे म्हणाले. तसंच हाथरस प्रकरणात योग्य कारवाई होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 4, 2020, 7:45 PM IST

ताज्या बातम्या