भाजपकडून सोशल डिस्टंसिंगचा नियम पायदळी, कार्यालयाबाहेर तोबा गर्दी

भाजपकडून सोशल डिस्टंसिंगचा नियम पायदळी, कार्यालयाबाहेर तोबा गर्दी

जालन्यात भाजपाकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाच्या निमित्ताने लोकांनी तोबा गर्दी करत लॉकडाऊनचा फज्जा उडवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला.

  • Share this:

जालना, 4 एप्रिल: जालन्यात भाजपाकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाच्या निमित्ताने लोकांनी तोबा गर्दी करत लॉकडाऊनचा फज्जा उडवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन पुकारलेला असून सर्वत्र त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारे रोजंदारीचे कामगार व निर्वासिताचे मोठे हाल होत आहे. अनेक सामाजिक, राजकिय व प्रशासकीय यंत्रणेकडून त्यांना मदतीचा हात दिला जात आहे. याच उपक्रमांतर्गत जालन्यात शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जीवनावश्यक वस्तू, धान्य व किराणा वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

हेही वाचा..मोठी बातमी! आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात 'कोरोना'चा धोका आणखी वाढला

मात्र, देशभरात कलम 144 अनव्ये संचारबंदी आणि संपूर्ण लॉकडाऊन सुरु आहे. याचा कदाचित भाजपला विसर पडला असावा. गरजू व्यक्तींना घरपोच जीवनावश्यक वस्तू देण्याऐवजी भाजपचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते शहरातील संभाजीनगर स्थित भाजप कार्यालयात या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. जीवनावश्यक वस्तू,अन्न-धान्य व किराणा घेण्यासाठी गोरगरीब नागरिकांनी भाजप कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

सोशल डिस्टंसिंगचा नियम पायदळी तुडवत जमलेल्या या गर्दीची माहिती अज्ञात व्यक्तीने पोलिसांना दिली. दरम्यान, सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सदर जमाव पांगवला. दरम्यान, भाजपकडूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लॉकडाऊनचा 'लॉ ब्रेक' करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा..दिवसा सुरक्षेचं काम, घरी परतल्यावर मास्कचं शिवणकाम, CM कडून कौतुकाची थाप

रावसाहेब दानवेंचा घणाघाती आरोप...

राज्यात संचारबंदी असल्याने अनेक लोकांना अन्नधान्यसाठी घराबाहेर पडावे लागत  आहे. केंद्र सरकारच्या वतीने पाठवण्यात आलेला रेशनचा साठा राज्य सरकारने ताब्यात घेऊन  तो गोरगरीबांना वितरित करावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारला केली आहे.

महाराष्ट्र सरकारला राज्यात लॉकडाऊनच्या काळात 22 लाख टन अन्नधान्याची गरज आहे. सद्या राज्यात 11.55 लाख मेट्रिक टन रेग्युलर आणि मोफत वाटपासाठी 10.50 लाख टन धन्यसाठी उपलब्ध आहे. राज्य सरकार फक्त एक महिन्याचा साठा वितरित करण्याचा जाचक अटी असलेला जीआर का काढला ? असा प्रश्न  रावसाहेब दानवे यांनी या वेळी उपस्थित केला आहे. राज्य सरकारने हा जीआर त्वरित रद्द करण्याची मागणी ही त्यांनी या वेळी केली. राज्यासाठी पुन्हा 16 रेव्ह रॅकद्वारे 50 हजार मेट्रिक टन गहू आणि तांदूळ हरियाणा आणि पंजाब राज्यातून पाठवण्यात आला आहे. तसेच संपूर्ण देशासाठी केंद्राकडून 58 रेल्वे रॅकद्वारे विविध भागात 1.62 लाख मेट्रिक टन धान्य साठा पंजाब आणि हरियाणा राज्यातून निघाले असल्याची माहिती ही त्यांनी या वेळी दिली. राज्यासह देशातआणीबाणीची परिस्थिती असताना दानवे यांनी केलेल्या मागणी आणि त्यांनी उपस्तीत केलेल्या प्रश्नांवरून राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

First published: April 4, 2020, 9:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading