मुक्ताईनगर, 18 नोव्हेंबर: वीज बिलात सवलत देण्याची भाषा करणाऱ्या राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आता आपला शब्द फिरवला आहे. याविरोधात भाजप नेते पुन्हा आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची सूनबाई आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी तीव्र प्रतिक्रीया दिली आहे.
वीज ग्राहकांना दिलासा देण्याची गरज आहे. मात्र, सरकारनं याबाबत योग्य भूमिका न घेतल्यास जनहितासाठी भाजप रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा देखील भाजप खासदार रक्षा खडसे यांनी दिला आहे.
हेही वाचा... उद्धव ठाकरे हिंदुत्त्व विचारसरणीचे नाहीतच, नारायण राणेंचा घणाघाती 'प्रहार'
खासदार रक्षा खडसे म्हणाल्या, 'जेवढं बिल आलेलं आहे, तेवढं बिल ग्राहकांना भरावंच लागेल', असं वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. ऊर्जामंत्र्यांचं वक्तव्य सपशेल चुकीचं आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं बिल माफ करू, असं राज्यातील जनतेला आश्वासन दिलं होतं. मात्र नितीन राऊत हे एक चांगले नेते आहे. त्यांनी आपला शब्द फिरवायला नको होता. संपूर्ण वीज बिल माफ करू शकले नसले तरी काही प्रमाणात ग्राहकांना सवलत द्यायला हवी, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी यावेळी केली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपला सातत्याने आंदोलन करण्याची गरज पडत आहे. कारण भाजप ही वैयक्तिक फायद्यासाठी नसून जनतेच्या हितासाठी आंदोलन करत आहेत, असं खासदार रक्षा खडसे यांनी सांगितलं.
विदर्भवाद्यांनी घेतली आक्रमक भूमिका...
विजबिलात सवलत देण्याची भाषा करणाऱ्या ऊर्जामंत्र्यांनी आता आपला शब्द फिरवला. याविरोधात विदर्भवाद्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळं हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 7 डिसेंबरला विदर्भात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विदर्भवादी ठिय्या आंदोलन करणार आहेत.
लॉकडाऊनच्या काळात ऊर्जा विभागानं अवास्तव बिलं पाठवली आहेत. यावर विरोधी पक्षांनी आंदोलन केली, संघटना रस्त्यावर उतरल्या. त्यामुळं विजबिलात सवलत देऊ असा शब्द ऊर्जामंत्र्यांनी दिला होता. मात्र, आता अचानक ऊर्जामंत्र्यांनी शब्द फिरवला.
हेही वाचा...गुंडांचा हैदोस! पोलीस स्टेशनजवळच लाठी-काठ्या, हॉकीने तरुणाला मारलं
विजबिलाची थकबाकी वसूल करू आणि बिल न भरणाऱ्यांचे वीज कनेक्शन कापलं जाईल, असं सांगितलं. त्यामुळे या विरोधात विदर्भवादी हिवाळी अधिवेशनाच्या पाहिल्याच दिवशी विदर्भात तालुकास्तरावर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक राम नेवले यांनी दिला आहे.