शिर्डी, 21 एप्रिल : राज्यात कोरोना संकटाचा वाढता प्रभाव लक्षात घेवून माध्यमांच्या प्रतिनिधीनी आपल्या आरोग्याची काळजी घेवून 'न्यूज फ्रॉम होम' या संकल्पनेतून काम करावे. शासनाने माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून याबाबत प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या व्यवस्थापनांना निर्णय करण्याबाबत सुचित करावे अशी विनंती भाजप नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
माध्यमांमध्ये काम करणाऱ्या 53 पत्रकारांमध्ये कोरोनाची लक्षण दिसून आली. या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्र देवून पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासन स्तरावर तातडीने निर्णय करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. पत्रकारांच्या आरोग्यासाठी वृतपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या व्यवस्थापनाने निर्णय करावा म्हणून शासनाने पुढाकार घ्यावा याकडे विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
कोरोना संकटाच्या या काळात माध्यमांच्या सर्वच प्रतिनिधींनी शहरात आणि ग्रामीण भागात या संकटाची वास्तविकता ,सरकारकडून सुरू असलेल्या उपाय योजना आणि या आपत्तीबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम कर्तव्य भावनेतून आणि जबाबदारीने सुरु ठेवले आहे. परंतु या पत्रकारांच्या आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्याने माध्यम क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या सर्वच व्यक्तींमध्ये याबाबत आता चिंता निर्माण झाली असल्याचे नमूद केले.
माध्यमांच्या व्यवस्थापनानेच फिल्डवर काम करणा-या प्रतिनिधीं संदर्भात खंबिर भूमिका घेवून 'न्यूज फ्रॉम होम' या संकल्पनेतून काम करण्याबाबत निर्णय करण्याची आवश्यकता आहे. पण याबाबतचा निर्णय अद्याप होत नसल्यामुळेच पत्रकार, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे प्रतिनिधी आणि कॅमेरामॅन यांचे आरोग्यच धोक्यात आल्याचे स्पष्ट दिसते.
हेही वाचा- देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला, या 2 महत्त्वपूर्ण विषयांवर झाली चर्चा
या पार्श्वभूमीवर माध्यमांच्या व्यवस्थापनाने घरुनच वार्ताकंन करण्याची व शक्य तिथेच व्हिज्युअल्स घेण्यासाठी परवानगी देण्याबाबत शासन स्तरावरुन सूचित करण्याची वेळ आली आहे. माध्यमांचे स्वातंत्र्य आबाधित ठेवून निर्णय घ्यावा, अशी विनंती विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Radhakrushan vilkhe patil, Uddhav thackeray