पंकजा मुंडे यांची नाराजी आताच का आली उफाळून? ही आहेत 3 महत्त्वाची कारणं

पंकजा मुंडे यांची नाराजी आताच का आली उफाळून? ही आहेत 3 महत्त्वाची कारणं

पंकजा मुंडे यांच्या नाराजीबाबत सध्या राज्यभर बोललं जात आहे. तसंच त्यांच्या राजकीय प्रवासाची चर्चा होत आहे.

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : भाजपमधील ओबीसींच्या मातब्बर नेत्या म्हणून पंकजा गोपीनाथ मुंडे या महाराष्ट्राला परिचीत आहेत. भाजप युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणीमधून राजकारणात पदार्पण केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात 2009 च्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात विजय संपादन केला. त्याच वेळी स्व.गोपीनाथ मुंडेची राजकीय वारस म्हणून लोकांमध्ये पंकजा यांची चर्चा झाली. यावर गोपीनाथ मुंडे यांनी भगवान गडावर शिक्कामोर्तब केलं. मात्र याच पंकजा मुंडे यांच्या नाराजीबाबत सध्या राज्यभर बोललं जात आहे. तसंच त्यांच्या राजकीय प्रवासाची चर्चा होत आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर लोकसभा निवडणुकीनंतर गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झालं. तेव्हा मुंडे समर्थकांची समजूत काढून पंकजा यांनी स्वतःला सावरलं. तसंच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांचा 26 हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर भाजप सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री, महिला बालकल्याण, जलसंधारण अशा अनेक खात्यांची जबाबदारी पार पाडली.

भाजपमध्ये पडणार मोठी फूट? 24 तासांत चित्र होणार स्पष्ट

एकीकडे पंकजा मुंडे मंत्री म्हणून काम पाहत असतानाच दसरा मेळाव्यावरून बीडमध्ये वातावरण ढवळून गेले. भगवान गडावरील दसरा मेळाव्यानंतर सावरगाव येथे भगवान भक्ती गड स्थापन करुन पंकजा मुंडेंनी नवी परंपरा सुरू केली. तिथं ओबीसी, ऊसतोड मजूर, वंजारा समाजाचे संघटन करुन शक्तीप्रदर्शन केले. यावेळी भगवान भक्ती गडावर येणारे लोक हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील असत. यामुळे पंकजा मुंडेंचा प्रभाव महाराष्ट्रातील काही मतदारसंघात निर्माण झाला. पंकजा मुंडे या साखर कारखानदार आणि ऊसतोड मजूर लवादाच्याही प्रमुख आहेत.

तुम्ही नाराज आहात का असा प्रश्न विचारल्यावर पंकजा मुंडेंचं सूचक विधान, म्हणाल्या...!

मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आणि पंकजा मुंडे यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी त्यांचा मोठा पराभव केला. परळी मतदारसंघात झालेल्या पंकजा मुंडे यांच्या पराभवाबद्दल राज्यभरात तर्क-वितर्क लढवले गेले. भाजप नेतृत्वानेच पंकजा मुंडेंचा पराभव घडवून आणला, असंही बोललं जात आहे. तसंच आता पंकजा मुंडे यांनी भाजपच्या महत्त्वाच्या बैठकींना जाणं टाळलं. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे नेमक्या कोणत्या कारणामुळे भाजपमध्ये नाराज झाल्या, याची चर्चा होत आहे.

मुख्यमंत्रिपदाची स्पर्धा आणि मनातल्या मुख्यमंत्री

लोकसभा निवडणुकीतील नरेंद्र मोदी यांच्या झंझावातानंतर 2014 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं. भाजपमधून तेव्हा मुख्यमंत्रिपदासाठी अनेक नावं आघाडीवर होती. यामध्ये अनेक वर्षांपासून पक्ष संघटना वाढवणारे एकनाथ खडसे, अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस, लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुढे नेणाऱ्या पंकजा मुंडे, अनेक वर्षांपासून भाजप आणि संघाशी एकनिष्ठ असलेले विनोद तावडे या नेत्यांचा समावेश होता. मात्र या सगळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारली आणि मुख्यमंत्रिपद मिळवलं.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरही पंकजा मुंडे यांची राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिली नाही. मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे, या पंकजा मुंडे यांच्या विधानाची जोरदार चर्चाही झाली. मात्र वडील गोपीनाथ मुंडे यांनी पक्षासाठी घेतलेले कष्ट आणि आपली राजकीय सक्रीयता, असं असतानाही मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने पंकजा मुंडे यांच्या मनात डावललं गेल्याची भावना निर्माण झाली का, असा प्रश्न निर्माण झाला होता.

5 वर्ष देवेंद्र फडणवीस हेच सरकारचा चेहरा

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार स्थापन होऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारला. त्यानंतर पुढील पाच वर्ष देवेंद्र फडणवीस हेच या सरकारचा चेहरा राहिल्याचं दिसून आलं. राज्यात शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप झाला. तसंच मराठा, धनगर आरक्षणासाठी मोठ-मोठे मोर्चे निघाले. भीमा-कोरेगावच्या निमित्ताने दलित समाजात अस्वस्थता पसरली. पण या सगळ्या प्रकरणांमध्ये देवेंद्र फडणवीस हेच नेतृत्व करताना दिसले. त्यामुळे इतर मंत्री काहीसे झाकोळले गेले. एकनाथ खडसे यांना तर काही महिन्यांतच मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं. या सगळ्यात पंकजा मुंडेही काहीशा बाजूला झाल्याच्या दिसून आलं.

विधानसभा निवडणुकीत पराभव

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघाने राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. कारण या मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजपच्या पंकजा मुंडे यांच्यात हायव्होल्टेज लढत होत होती. दोन्हीही उमेदवारांनी ही लढत प्रतिष्ठेची केली होती. प्रचारादरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. अखेर या प्रतिष्ठेच्या लढतीत धनंजय मुंडे यांनी बाजी मारली. पंकजा मुंडे यांना पराभवाचा पहिला धक्का बसला. त्यानंतर पंकजा मुंडे फारशा माध्यमांसमोरही आल्या नाहीत. त्यामुळे हा पराभव पंकजा मुंडेंच्या जिव्हारी लागल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहित कार्यकर्त्यांना 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावर उपस्थित राहण्यासाठी हाक दिली आहे. या मेळाव्यातच पंकजा मुंडे आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट करणार आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: December 11, 2019, 3:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading