पंकजा मुंडे पुन्हा सरकारविरोधात आक्रमक, शिक्षकांच्या मुद्द्यावर साधला निशाणा

पंकजा मुंडे पुन्हा सरकारविरोधात आक्रमक, शिक्षकांच्या मुद्द्यावर साधला निशाणा

शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईनवरुन ऑफलाईन करण्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, 7 फेब्रुवारी : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईनवरुन ऑफलाईन करण्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. तसंच 'विद्यादानाचं पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांना कायमचं त्रासातून मुक्त केले आहे, त्यांना परत यात सरकारने ढकलू नये,' असं आवाहनही पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे.

'शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या हा विषय डायरेक्ट जनतेतून सरपंच, जलयुक्त शिवार सारखा महत्वाचा आणि लोकप्रिय आहे. जो गरीब आहे... ज्याचा वशिला नाही... त्यालाही अधिकार असावेत. यासारखे निर्णय रद्द करण्यापेक्षा सर्व विभागांनी त्यांना रेप्लिकेट करावे,' असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

महाराष्ट्र भाजपमध्ये मोठ्या बदलाची शक्यता

एकीकडे पंकजा मुंडे हळूहळू सरकारविरोधात आक्रमक होत असताना दुसरीकडे त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चाही जोर धरू लागली आहे. विधानसभा निवडणुकांना आता काही महिने उलटून गेले आहेत. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळे नंतर मोठं महाभारत राज्यात घडलं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं. यानंतर आता भाजपचं हायकमांड महाराष्ट्रात मोठे बदल करण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. राज्यातल्या राजकारणाची सध्याची दिशा आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन अमित शहा यांनी महाराष्ट्रात लक्ष घालण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक घटना घडल्या होत्या. पंकजा मुंडे या दिग्गज नेत्या पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे पक्षांतर्गतही नाराजी उफाळून आली होती. त्या पार्श्वभूमीवर काही मोठे बदल होऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बोलावण्याची शक्यताही आहे. त्यांना केंद्रात जबाबदारी देऊन महाराष्ट्रात नव्या नेत्याला संधी दिली जाऊ शकते. असं झालं तर चंद्रकांत पाटील यांची विरोधीपक्ष नेते पदावर निवड होऊ शकते तर पंकजा मुंडे यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं जाऊ शकते, असं बोललं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2020 09:13 PM IST

ताज्या बातम्या