'वैद्यनाथ'ला 11 कोटींची थकहमी, श्रेयवादावरून मुंडे बहीण-भावात पुन्हा वादाची ठिणगी

'वैद्यनाथ'ला 11 कोटींची थकहमी, श्रेयवादावरून मुंडे बहीण-भावात पुन्हा वादाची ठिणगी

विधानसभा निवडणुकांनंतर मुंडे बहीण-भावा मधील संघर्ष काही काळ थांबला होता. मात्र, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या थकहमी वरून पुन्हा एकदा हा संघर्ष पाहायला मिळत आहे.

  • Share this:

बीड, 24 सप्टेंबर: परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला 10 कोटी 77 लाख रुपयांची थकहमी मिळाल्यानंतर श्रेयवादावरून मुंडे बहीण-भावात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मदत मिळवून दिल्याचा दावा केला आहे तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून स्वतः प्रयत्न केल्याचं स्पष्ट केलं आहे. यावरून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पुन्हा आमने-सामने आले आहेत.

हेही वाचा... कल्याण-डोंबिवली मनपाचा भोंगळ कारभार! कोविड सेंटरमधल्या जेवणात सापडल्या अळ्या

विधानसभा निवडणुकांनंतर मुंडे बहीण-भावा मधील संघर्ष काही काळ थांबला होता. मात्र, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या थकहमी वरून पुन्हा एकदा हा संघर्ष पाहायला मिळत आहे.

वैद्यनाथची थकहमी मिळावी यासाठी आग्रही मागणी केल्यामुळेच ती राज्य सरकारने मंजूर केली, असा दावा राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून केला जात आहे. तर वैद्यनाथ कारखाना आणि मी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार, सहकार मंत्री आणि साखर संघ यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यामुळेच थकहमी मिळाली असा दावा भाजपा नेत्या आणि चेअरमन पंकजा मुंडे करत आहेत.

परळी मतदार संघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कर्मचाऱ्यांची पगार, एफआरपी, ऊसाचे थकीत बिल, देयके हे कळीचे मुद्दे पंकजा मुंडेंना महागात पडले होते. कारखाना आर्थिक अडचणीत असल्याचे पंकजा मुंडेंकडून सांगण्यात येत होतं. मात्र निवडणुकीत याचा परिणाम दिसून आला. महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील 32 आर्थिक अडचणीतील साखर कारखान्यांना थकहमी देण्याचा निर्णय घेतल. यात वैद्यनाथ साखर कारखान्याला 10 कोटी 77 लाख रुपयांची थकहमी मिळाली.

धनंजय मुंडेचा दावा..

साखर कारखान्याच्या विषयात राजकारण आणणार नसल्याचे धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवले. शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी केल्याचा दावा करत आता तरी शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचे पैसे देऊन ‘वैद्यनाथ’सांभाळावा असा सल्ला धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे.

दिवंगत गोपीनाथ मुंडे व पंडित अण्णा मुंडे या दोघांनी कष्टाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना उभा करून कारखान्याला आघाडीवर नेले होते. मात्र, पंकजा मुंडे यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा आल्यानंतर 5 वर्षांतच कर्मचाऱ्यांवर थकीत पगारासाठी उपोषणाची वेळ आली, हे दुर्दैव आहे. आता तरी गळीत हंगाम सुरू करून परिसरातील ऊसाचे गाळप करावे, असं देखील धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा...40 कोटी जनतेच्या रोजगारावर संकट, रिटेल सेक्टरला सरकारने विशेष पॅकेज द्यावं- CAIT

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

मुख्यमंत्री, सहकार मंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि साखर संघाकडे आपण वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने 10 कोटी 77 लाख रूपये थकहमी मंजूर केली आहे. यात इतरांनी श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारनं राज्यातील 32 साखर कारखान्यांना थकहमी मंजूर करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभारही मानले आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: September 24, 2020, 12:24 PM IST

ताज्या बातम्या