नागपूर, 29 फेब्रुवारी : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून सध्या देशभरात वाद सुरू आहे. अशातच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याबाबत भाष्य केलं आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल कुणी वाईट बोलतं तेव्हा मला भयंकर वाईट वाटतं. कारण सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे,' असं म्हणत नितीन गडकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'देशातल्या एका मोठ्या नेत्यासोबत सावरकरांबद्दल वाईट बोलल्यावर माझी एकदा भेट झाली. मी त्यांना म्हणालो राजकारण ठीक आहे ,पण सावरकरांबद्दल वाईट बोलू नका. तुम्ही सावरकरांबद्दल व संघाबद्दल एकदा अभ्यास करा. ते मला म्हणाले की, आप तो आरएसएस के स्वयंसेवक है, आप अच्छे है. मी म्हणालो, मै अगर अच्छा हूं तो संघ भी अच्छा है और सावरकर भी अच्छे है. अगर सावरकर गलत है और संघ गलत है तो मै भी गलत हूं. आप ठीक से अध्ययन किजीये और समझने के बाद विरोध किजीये,' असा किस्सा नितीन गडकरी यांनी सांगितला.
'आपल्या विरोधकांना आपले सत्य स्वरुप भेटून समजावून सांगायला हवे. तेव्हाच आपण त्याचे मन बदलवू शकतो. मोठ्या पदावर असणाऱ्यांनी कार्यकर्त्यांची काळजी घेतली पाहिजे. कारण सत्येच्या उन्मादात आणि अहंकारात असा भाव निर्माण होतो की, जे काही आहे ते आपल्यामुळेच आहे. आपल्या वागण्या बोलण्यात अहंकाराचा दर्भ चढत जातो, तो दर्प मी पणा वाढवत जातो. आपण श्रेष्ठ आहोत आपण मोठे आहोत, बाकीचे काय, अशी भावना काही वेळा होते काही लोकांमध्ये,' असं म्हणत नितीन गडकरी यांनी विरोधकांना टोला लगावला.
हेही वाचा- फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र असलेला बॅनर होत आहे VIRAL, 'हे' आहे कारण
दरम्यान, एकीकडे नितीन गडकरी यांनी सावकरांवर होणाऱ्या टीकेचा समाचार घेतला असतानाच दुसरीकडे, पुण्यात सावरकरांसंबंधित कार्यक्रमाला विरोध झाला आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'मी सावरकर' या वक्तृत्व स्पर्धेवेळी वाद झाला आहे. या स्पर्धेच्या समारोपाला आलेल्या अभिनेते शरद पोंक्षे यांना पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या विरोधाचा सामना करावा लागला. त्यामुळे विद्यार्थी संघटनांच्या रोषाला बळी पडावं लागू नये म्हणून शरद पोंक्षे हे गुपचूप दुसऱ्या मार्गाने सभागृहात पोहोचले.
शरद पोंक्षे हे 'मी सावरकर' या वक्तृत्व स्पर्धेच्या समारोपासाठी फर्ग्युसन कॉलेजमध्ये येणार हे कळताच पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी विरोध सुरू केला. तसंच त्यांच्या आगमनावेळी जोरदार घोषणाबाजीही केली. पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या घोषणाबाजीला अभाविपकडूनही घोषणाबाजी करून प्रत्युत्तर देण्यात आलं.