मुंबई, 22 नोव्हेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नाही. निवडणुकीपूर्वी असलेल्या भाजप आणि शिवसेना महायुतीने बहुमताचा जादुई आकडा गाठला. मात्र मुख्यमंत्रिपदावरून या दोन्ही पक्षांमध्ये बिनसलं आणि सर्वाधिक जागा मिळूनही भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं आहे. आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा ऐतिहासिक आघाडीच्या सत्तास्थापनेचा मार्ग सुकर झालेला आहे. या आघाडीबाबत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भविष्यवाणी केली आहे.
'शिवसेना आणि भाजपची युती हिंदुत्वावर आधारित होती. ही युती तुटणं हिंदुत्वासाठी आणि मराठी माणसासाठी नुकसानदायक होतं. मात्र आता जी महाआघाडी झाली आहे ती संधीसाधूपणासाठी झाली आहे. त्यामुळे ही आघाडी फार काळ टिकू शकणार नाही. ही महाआघाडी महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ शकणार नाही,' असं म्हणत नितीन गडकरी यांनी आपलं भाकित वर्तवलं आहे.
महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू असले तरीही या सर्व प्रकारणात भाजपने मात्र शांत राहण्याची भूमिका घेतली आहे. नितीन गडकरी यांचा अपवाद वगळता भाजपच्या दुसऱ्या कोणत्याही मोठ्या नेत्याने याबाबत भाष्य करणं टाळलं आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप नेमकी काय भूमिका घेतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष संपण्याची चिन्हे दिसत असली तरीही मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव सर्वात आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र आता शेवटच्या क्षणी शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांचंही नाव पुढे आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही संजय राऊत यांच्या नावाकडे कल असल्याची माहिती आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा