मुंबई, 29 ऑक्टोबर: महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल, या दृष्टीनं आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिले. उद्धव ठाकरे यांच्या एकला चलो रेच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट शिवसेनेला टोला लगावला होता.
शरद पवारांच्या खोचक टीकेनंतर आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मानलं पवार साहेब आपल्याला... महिनाभर कौतुक करतात आणि एका दिवसांत वर्षभराची उतरून टाकता. पवार साहेबांनी एका वाक्यात कान टोचले व कानपटीत पण दिली, असं ट्वीट करून निलेश राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा प्रहार केला आहे.
मानलं पवार साहेब आपल्याला... महिनाभर कौतुक करता आणि एक दिवसात वर्षभराची उतरून टाकता. पवार साहेबांनी एका वाक्यात कान टोचले व कानपटीत पण दिली. https://t.co/vtHnwzT6ny
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 29, 2020
नेमकं काय म्हणाले होते पवार साहेब?
शरद पवार काल नाशिकच्या दौऱ्यावर होते. महाविकास आघाडीत असून शिवसेना आपल्या कार्यकर्त्यांना एकला चलो रेचा नारा देत आहे. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, शिवसेना स्वबळावर भगवा फडकवणार हे शिवसैनिकांना सांगत असेल. पण हे मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकत आलो आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षाच्या नेत्यांना आपला पक्ष मोठं करण्याचं स्वातंत्र्य आहे.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवाव्या का? हा निर्णय इतर संबंधित पक्ष आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेतील. मात्र, भाजपला दूर ठेवण्यासाठी आपण एकत्र आलो आहेत, हे महाविकास आघाडीतील नेत्यांनी विसरू नये. महाविकस आघाडी सरकारला राज्यातील जनतेची पसंती आहे. जनतेच्या भल्यासाठी निर्णय घ्या, असा सल्ला देखील शरद पवार यांनी यावेळी दिला.
हेही वाचा...एकनाथ खडसेंच्या होमपिचवर भाजपची पुन्हा पक्षबांधणी, पण.. गिरीश महाजनांची दांडी
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. 'हा घ्या घरचा आहेर... सोनाराने कान टोचले ते बरं झालं, असं आमदातर भातखेळकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.