मुंबई, 16 ऑक्टोबर: सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही बसला परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिकंही वाया गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, दुसरीकडे भाजप नेते निलेश राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा...कन्हैय्या कुमार यांनी घेतली ठाकरे सरकारमधील बड्या मंत्र्याची भेट, राज्यात खळबळ
'परतीच्या पावसामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुलाचे छंद जोपासायचे सोडून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर लक्ष द्या, असं ट्वीट करून निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.
परतीच्या पावसामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॉलीवुडची चाटूगिरी करतायत. मुलाचे छंद जोपासायचे सोडून द्या आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर लक्ष द्या.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 15, 2020
दरम्यान, राज्यात अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी झालेल्या नुकसानानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रखर टीका केली. 'मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा. आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल ऑनलाइन बघता येणार नाहीत. थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत द्या, अन्यथा लोकांचा 'ठाकरे' नावावरील विश्वास उडेल.,' असं ट्वीट बाळा नांदगावकर यांनी केलं होतं.
बाळा नांदगावकर यांच्या या टीकेला राज्याचे कृषिमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दादा भुसे यांनी दिले उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, मी राज्यभर दौरे करून शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या जाणून घेतल्या. एक ते दीड महिन्याच्या कालावधीत कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात मुख्यमंत्रांनी 6 वेळा बैठका घेतल्या आहेत, अशा शब्दांत दादा भुसे यांनी बाळा नांदगावकर यांना उत्तर दिलं आहे. आता निलेश राणे यांच्या टीकेवर शिवसेना काय पलटवार करते, हे पाहाणं, महत्त्वाचं ठरणार आहे.
हवामान विभागाचा इशारा...
नागपुरसह विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झालेला आहे. नागपूरसह विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडल्यामुळे याचा फटका शेतकऱ्याला बसू शकतो. आज काही ठिकाणी थोड्या प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
नैसर्गिक आपत्तीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी..
यावर्षीच्या मान्सूनने आधी विदर्भात पूरस्थिती निर्माण केली होती तर आता परतीच्या पावसाचाही मोठा फटका सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही बसला आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिकंही वाया गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवेल पण केंद्र सरकारनेही त्यासाठी भरीव आर्थिक मदत द्यावी , अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
हेही वाचा..मंदिराचा मुद्दा घेऊन भाजप करतेय राजकारण, सुनील तटकरेंची खोचक टीका
थोरात पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने राज्याला भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता केंद्राकडून तुटपुंजी मदतच केली गेली आहे. आता तर राज्य सरकारसमोर कोरोना संकटामुळे मोठ्या आर्थिक अडचणी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करुन राज्याला जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न करतील असेही थोरात यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aaditya thackeray, Maharashtra, Nilesh rane, Udhav thackarey