'मर्द होतास तर तपास का नाही केला?' केसरकरांच्या आरोपानंतर नारायण राणे भडकले

'मर्द होतास तर तपास का नाही केला?' केसरकरांच्या आरोपानंतर नारायण राणे भडकले

केसरकरांच्या टीकेला राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

  • Share this:

दिनेश केळुसकर, सिंधुदुर्ग, 28 डिसेंबर : सावंतवाडी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकीय वातावरण तापलं आहे. 'नारायण राणे यांच्याकडील पैशाला रक्ताचा वास आहे,' असा गंभीर आरोप शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केला होता. केसरकरांच्या या टीकेला राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

'मर्द होतास तर का नाही केलास तपास ? असा सवाल नारायण राणे यांनी गुंडगिरीचा आरोप करणाऱ्या दीपक केसरकर यांना केला आहे. 'केसरकरांनी सावंतवाडीत एकही विकास प्रकल्प सुरू केला नाही. माझ्यावर खूनाचा आरोप करणाऱ्या केसरकरांनी 5 वर्ष गृहराज्यमंत्री असताना तपास का केला नाही,' असा सवाल करत नारायण राणेंनी केसरकर यांना लक्ष्य केलं आहे.

दरम्यान, सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणुकीचं राजकारण चांगलंच तापलं असून शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी नारायण राणेंसह भाजपाच्या नेत्यांवर कडाडून टीका केली. राणेंसह भाजपाच्या नेत्यांकडून सावंतवाडी निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या पैशाला खुनाचा, खंडणीचा आणि रक्ताचा वास असल्याचा गंभीर आरोप केसरकर यांनी केला होता. वेळ पडल्यास भाजपाच्या इतर नेत्यांची कुंडली आपण बाहेर काढू असा इशाराही केसरकर यांनी दिला.

केसरकरांवर भाजपनेही केला होता पलटवार

दीपक केसरकर यांनी राणेंसह भाजपवर जहरी टीका केल्यानंतर भाजपनेही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. केसरकर हे श्वान परंपरेतले असल्याची टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली होती. त्यामुळे 29 डिसेंबरला होणाऱ्या या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जोरदार धुमशान सुरू झालं.

'भाजपच्या राज्यात न्याय मागणाऱ्यांना बंदुकीच्या गोळ्या', शिवसेनेचा घणाघात

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तिथे नारायण राणे यांचाही प्रभाव आहे. भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर कोकणात राजकीय युद्ध तापलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात नारायण राणे हे भाजपच्या अधिक जवळ गेले तर विधानसभा निवडणुकीत्या आधी त्यांनी आपला स्वाभिमान हा पक्षच भाजपमध्ये विलीन केला.

कोकणात खरा सामना रंगतोय तो राणे विरुद्ध शिवसेना असा. युती तुटल्यानंतर सावंतवाडीत पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. आत्तापर्यंत भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवत असे आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं असून राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडत आहेत.

कोकणातल्या राजकारणात केसरकर आणि नारायण राणे यांचं कधीच सख्य नव्हतं. ते कायम एकमेकांवर जहरी टीका करत असतात. आता राणे भाजपच्या तंबूत गेल्याने शिवसेनेची टीका आणखी तीव्र झाली आहे. विधानसभा निवडणुकीत नितेश राणे हे भाजपचे कणकवलीचे उमेदवार होते. मात्र शिवसेनेने युती तोडत कणकवलीत आपला उमेदवार उभा केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तिथे प्रचाराला गेले होते. खुद्द देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी शिवसेनेने उमेदवार उभा करू नये असं सांगितलं. तर शिवसेनेसोबत किती दिवस वैर ठेवणार आता समेट केला पाहिजे असा सल्ला राणे यांना दिला होता. मात्र तो समेट घडून आला नाही. नंतर युतीच तुटल्याने आता कोकणात राजकीय युद्ध आणखी रंगण्याची शक्यता आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 28, 2019, 10:04 AM IST

ताज्या बातम्या