नाशिक, 31 जुलै : नाशिक जिल्ह्यात सर्वसामान्यापाठोपाठ लोकप्रतिनिधीही आता मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे शिकार होताना दिसत आहेत. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांना करोनाची लागण झाली आहे. आहेर यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्यांच्या घरातच अलगीकरण करण्यात आले आहे.
केदा आहेर यांच्या संपर्कात आलेल्या बँकेच्या कर्मचाऱ्यांसह देवळा बाजार समितीतील संचालकांनीही आता स्वत:ला क्वारन्टाइन करून घेतले आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच असून नागरिकांसह लोकप्रतिनिधींनाही करोनाची लागण मोठ्या प्रमाणावर होत आहे. यापूर्वी देवळालीच्या आमदार सरोज आहेर, भाजपचे चांदवडचे आमदार अॅ़ड राहूल आहेर, शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र दराडे पॉझिटिव्ह आले होते.
दरम्यान, नाशिक महानगरपालिकेतही दोन नगरसेवक करोना पॉझिटिव्ह आले होते. शुक्रवारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेल्या आहेरांनाच करोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे.
दुसरीकडे, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा-लोहारा तालुका विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांचा गुरुवारी रात्री कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. चौगुले यांना मधुमेह व रक्तदाबाचा आजार असल्याने उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.