एकनाथ खडसे म्हणाले, पक्ष तिकीट देओ अथवा न देओ जनता जनार्दन पाठीशी..

एकनाथ खडसे म्हणाले, पक्ष तिकीट देओ अथवा न देओ जनता जनार्दन पाठीशी..

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा मनातील खदखद व्यक्त करत पक्षाला घरचा आहेर दिली आहे.

  • Share this:

इम्तियाज अहमद, (प्रतिनिधी)

रावेर, 5 जुलै- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा मनातील खदखद व्यक्त करत पक्षाला घरचा आहेर दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष तिकीट देओ अथवा न देओ जनता जनार्दन माझ्या पाठीशी असल्याचे खडसेंनी म्हटले आहे. दुसर्‍या पक्षातील लोकांना मंत्रिपदाचे तिकीट देतात परंतु पक्षाकडून निष्ठावंतांची अवहेलना करण्याचे काम सुरू असल्याची घणाघाती टीका खडसे यांनी रावेरमध्ये झालेल्या चिंतन बैठकीत केली आहे. एकनाथ खडसेंच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकारी मात्र सुन्न झाले आहेत. विधानसभेतील माझ्या भाषणावर सरकारकडे एक चकार शब्द नाही, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

भाजपची विस्तृत व चिंतन बैठक रावेरमध्ये शुक्रवारी झाली. खडसे म्हणाले, माझे मंत्रिपद गेल्यापासून मी आणलेले अनेक प्रकल्प रखडल्याने जळगाव जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. मी चाळीस वर्षापूर्वी लावलेले रोपटे मोठे झाले असून ते मी तोडणार नाही. मी जसा बाजूला झालो आहे, तसे तुम्ही देखील एक दिवशी बाजूला व्हाल, असा सूचक टोला खडसेंनी कुणाचेही नाव घेता या वेळी लगावला. ते म्हणाले की, मी जनतेत राहणारा नेता असून जमिनीवर राहूनच काम केले आहे. म्हणून मंत्रिपद गेल्यावर सुद्धा मला काहीच फरक पडलेला नाही. नुकसान झाले आहे माझ्या गरीब जनतेचे! अशा भावूक शब्दात रावेरमध्ये भाजप कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांशी खडसेंनी संवाद साधला, त्यांना मार्गदर्शन केले.

सभागृहातही मनातली बोलून दाखवली मनातील वेदना..

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पक्षात सध्या एकटे पडले आहेत. मुख्यमंत्र्यांशी पंगा घेणं त्यांना चांगलंच महागात पडले आहे. खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. नंतर दाऊद इब्राहिमसोबत त्यांचे संबंध असल्याचेही आरोप करण्यात आला होता. या आरोपांमुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून खडसे एकाकी पडले आहेत. अखेरच्या विस्तारातही त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी खडसेंनी आपल्या मनातली खदखद आणि वेदना थेट सभागृहात बोलून दाखवली होती.

'माझ्या आयुष्यात एकही निवडणूक मी हरलो नाही. 40 वर्षांत एकही आरोप सिद्ध झालेला नाही. आरोप, प्रत्यारोप सभागृहात होतच असतात. पण विरोधी पक्षनेता म्हणून मी कायम पुराव्यांसह आरोप केले. कारण बिनबुडाच्या आरोपाने काय वेदना होतात हे मला माहिती आहे. विधानसभेतल्या 288 आमदारांपैकी सर्वात भ्रष्ट आणि नालायक आमदार म्हणून मी आज आहे, उभा आहे,' अशी खंत त्यांनी आपल्यावरच्या आरोपांचा आधार घेत व्यक्त केली होती.

दाऊदची बायको का बोलेल?

सभागृहातील विरोधक आणि सत्ताधारी आमदारांपैकी कोणीही नाही, पण बाहेरच्या व्यक्तीने माझ्यावर आरोप केलेत. दाऊदच्या बायकोशी माझे बोलण्याची संबंध जोडले गेले. दाऊदला सोडून तिला नाथाभाऊशी का बोलावं वाटलं, हे मला कळलंच नाही. एटीएस आणि इतर यंत्रणांनी केलेल्या चौकशीत काहीच सिद्ध झाले नाही. याचे मला आणि माझ्या बायकोला दोघांनाही बरे वाटले. मात्र, नुकसान जे व्हायचे होते ते होऊन गेले.

खडसे गहिवरले

एकही इंच जमीन घेतली नसताना, सर्व नियमांचे पालन करूनही माजी न्यायमूर्ती झोटिंग यांची समिती नेमली. अँटी करप्शनकडून दोनदा चौकशी झाली. इन्कम टॅक्सची घरी रेड पडली. माझ्या बायका पोरांना चौकशीसाठी नेण्यात आले. मी जमिनदाराचा मुलगा आहे. माझा शेतीव्यतिरिक्त माझा एकही उद्योग नाही, हे सांगताना त्यांन गहिवरून आले.

मला भ्रष्टाचाराचा डाग नको

संपूर्ण प्रॉपर्टीची चौकशी करून एकही अपसंपदा नाही, असे चौकशीतून स्पष्ट झाले होते. एकही शैक्षणिक संस्था नाही, कारण डोनेशन घेण्याचा दमच कधी नव्हता. मी शेवटच्या दिवशी यासाठी उभा आहे कारण हा भ्रष्ट, नालायक, चोर उच्चका सदस्य म्हणून या सभागृहातून मला जायचे नाही. सभागृहाला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की हा डाग मला घेऊन जायची संधी देऊ नका, असे आवाहनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले.

खोटे आरोप करणाऱ्यांना शिक्षा करा

आरोप करून एखाद्याचे आयुष्य उद्धवस्त करणाऱ्यांना शिक्षा करा. विनापुरावे आरोप करणारा व्यक्ती आज घरी आहे, काय न्याय आहे या राज्यात? कोणाच्या जीवनात असा प्रसंग येऊ नये. यापेक्षा वाईट कोणाच्या जीवनात काही होऊ शकेल असे वाटत नाही. काही चुकीचे बोललो असेल तर सर्वांची क्षमा मागतो असे सांगत त्यांनी आपले भाषण संपवले होते.

First published: July 5, 2019, 6:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading