उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीबद्दल एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस हे सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबत टीका करत असताना खडसे यांनी मात्र या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

  • Share this:

इम्तियाज अहमद, जळगाव, 22 डिसेंबर : 'उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने नुकतीच शेतकऱ्यांसाठी दिलेल्या कर्जमाफीचे निकष अजून निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणे उचित नाही,' असं भाजप नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी खडसेंनी या निर्णयाचं स्वागतही केलं आहे.

या कर्जमाफीच्या निर्णयाने शेतकऱ्यांचं पूर्णपणे समाधान होणार नसलं तरीही दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकीकडे भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबत टीका करत असताना खडसे यांनी मात्र या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

'घोटाळा झाला किंवा नाही ते बाहेर येईल'

'कॅगचा 65 हजार रुपयांच्या अनियमिततेचा अहवाल म्हणजे उपयोगिता प्रमाण पत्र सादर करण्यात आलेले नाही म्हणून हा अहवाल आहे. त्यामुळे हा गैर व्यवहार झाला असं आजच म्हणता येणार नाही. मात्र उपयोगिता प्रमाणपत्र सरकार किती सादर करते त्यावर पुढील काळात यामध्ये गैरव्यवहार झाला किंवा नाही ते समोर येईल,' अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

'त्या बातम्या चुकीच्या'

'आपण पक्ष चालवला आहे. त्यामुळे आपल्याला माहीत आहे की कोणत्याही पक्षाला अशी पाच दिवसाची मुदत देता येत नाही. त्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागतो. त्यामुळे आपल्याला त्रास देणाऱ्यांवर पाच दिवसात कारवाई नाही झाल्यास आपण पक्ष बदलणार ही माध्यमांच्यामध्ये येणारी बातमी चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे,' असा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

शरद पवारांबाबत मौन

शरद पवार यांनी खडसे यांचं समाधान करण्यासाठी लागणारी साधनसामग्री आपल्य कडे नसल्याचं विधान नुकतंच केलं होतं. या विषयावर बोलताना खडसे यांनी मौन बाळगणेच पसंत केल्याचं पाहायला मिळालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 22, 2019 12:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading