नाराज खडसे दिल्लीला रवाना, छगन भुजबळांनीही दिली प्रतिक्रिया

नाराज खडसे दिल्लीला रवाना, छगन भुजबळांनीही दिली प्रतिक्रिया

भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना भेटण्याचा एकनाथ खडसे यांचा प्रयत्न असणार आहे.

  • Share this:

जळगाव, 9 डिसेंबर : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे हे दिल्लीत दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवत होते. त्यानंतर काल (रविवारी) कर्नाटक एक्सप्रेसनं ते दिल्लीसाठी रवाना झाले आणि आज सकाळी दिल्लीत पोहचले आहेत.

एकनाथ खडसे हे पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले असले तरीही ते आपली नाराजी पक्षश्रेष्ठीच्या कानावर घालण्याचा प्रयत्न करणार आहेत. भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना भेटण्याचा एकनाथ खडसे यांचा प्रयत्न असणार आहे. तसंच दुसऱ्या एका बड्या राजकीय नेत्यांसोबत त्यांची भेट होणार असल्याची माहिती आहे.

मागील 4 वर्षांपासून भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे पक्षात बंड करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपमधील नाराज नेत्यांच्या बैठकीचं सत्रही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच एकनाथ खडसे हे शिवसेना किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खडसे यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे.

खडसेंच्या नाराजीवर भुजबळांची प्रतिक्रिया

'भाजपमध्ये ओबीसी नेते नाराज आहेत, या एकनाथ खडसे यांच्या आरोपात तथ्य आहे. मात्र हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. खडसे कोणाला भेटले म्हणजे त्या पक्षात गेले असा अर्थ होत नाही. एकनाथ खडसे हे अनुभवी नेते आहेत. ते योग्य निर्णय घेतील,' असं म्हणत छगन भुजबळ यांनी एकनाथ खडसे यांच्या नाराजीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपमध्ये मोठी धुसफूस

2014 मध्ये राज्यात सत्तांतर घडल्यानंतर भाजपमध्ये नेतृत्वावरून कुरघोडी सुरू झाली. मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत एकनाथ खडसे यांना मागे टाकत देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारली. त्यानंतर काही महिन्यांनी एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळातूनही बाहेर पडावं लागलं.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तर एकनाथ खडसे यांना भाजपकडून तिकीटही देण्यात आलं नाही. तसंच त्यांची मुलगी रोहिणी यांना मुक्ताईनगरमधून भाजपचं तिकीट मिळालं खरं पण त्यांच्या या निवडणुकीत पराभव झाला. या सर्व पार्श्वभूमीवर आता एकनाथ खडसे यांनी आक्रमक भूमिका घेत देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तसंच एकनाथ खडसे हे बंडाच्या पवित्र्यात असल्याचीही चर्चा होत आहे. त्यामुळे आगामी काळात एकनाथ खडसे नेमका काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: December 9, 2019, 1:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading