एकनाथ खडसेंनी विधानसभेतच गमावली सुवर्णसंधी? राजकीय वर्तुळात चर्चा

एकनाथ खडसेंनी विधानसभेतच गमावली सुवर्णसंधी? राजकीय वर्तुळात चर्चा

ऐनवेळी भाजपनं एकनाथ खडसे यांच्या मुलीला विधानसभा उमेदवारी जाहीर केली आणि तिथेच खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश गुंडाळला गेला होता.

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेश कार्यालयात जळगाव जिल्ह्यातील बैठक नुकतीच झाली. या बैठकीत भाजप नेते एकनाथ खडसे यांचा विषय निघणार नाही असं होणं शक्य नव्हतं. एकनाथ खडसे यांच्याविषयी चर्चा झाली आणि हल्ली खडसे करतात तरी काय? हा प्रश्न उपस्थित झालाच.

खडसे राष्ट्रवादीमध्ये येतील या शक्यतांवर माध्यमातून चर्चा रंगली. पण खडसे यांना आता राष्ट्रवादी प्रवेश देईल का? किंवा खडसे आता राष्ट्रवादीमध्ये जातील का? या शक्यता धूसर होत चालल्या आहेत. जर यदा-कदाचित ते राष्ट्रवादीत गेलेच तर त्यांना किती मानाचं स्थान असेल हा मुद्दा वादातच आहे.

विधानसभा 2019 ला एकनाथ खडसे यांना तिकीट देण्यास भाजपाने नकार दिला. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने खडसे यांना पक्षात येण्यास गळ घातली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार खडसे यांना घ्यायला निघाले देखील होते. पण ऐनवेळी भाजपनं एकनाथ खडसे यांच्या मुलीला विधानसभा उमेदवारी जाहीर केली आणि तिथेच खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश गुंडाळला गेला.

...तर महाराष्ट्रातील राजकारणाचं चित्र पालटलं असतं?

जर खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश झाला असता तर शहादा , धुळे शहर , जळगाव शहर , मुक्ताईनगर , चाळीसगाव , भुसावळ , चिंचवड , कल्याण पूर्व , नाशिक पश्चिम , नाशिक मध्य , उल्हासनगर , ऐरोली / बेलापूर या जागी भाजपाचा विजय मिळवणं कठीण गेलं असतं. या मतदारसंघात खानदेशी मतदारांची संख्या निर्णायक आहे. पक्षा पलीकडे खडसे यांना मानणारा मोठा वर्ग आहे . बेलापूर ऐरोली वगळता उर्वरित 10 मतदारसंघात भाजपचा निसटता विजय झाला आहे. खडसे यांनी पक्ष बदल केला असता तर 10 जागा राष्ट्रवादीच्या गोटात गेल्या असत्या, अशीही शक्यता होती.

विधानसभा निवडणुकीत भाजपला आपली किंमत दाखवण्याची मोठी संधी खडसेंनी गमावली. ऐन वेळी खडसेंनी बंडाची तलवार म्यान केली. कदाचित पुन्हा सत्तेत भाजप येईल आणि जर भाजपची सत्ता आली तर पुन्हा चौकशीचा ससेमिरा अशी अंधुकशी भीती खडसे यांना वाटली असावी, असंही बोललं जात आहे.

ऐन निवडणुकीच्या काळात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेत येईल हे भाकीत राज्यात सर्वप्रथम कोणी वर्तवलं असेल तर ते एकनाथ खडसे होते. पण स्वतःच्या भविष्यवाणी वर त्यांनी विश्वास ठेवला नव्हता का, असा प्रश्न निर्माण झाला.

सत्तेत आल्यानंतर पक्षबांधणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला आता खडसे यांची तेवढी गरज नाही. खडसेंना घेतलं तर पक्षात स्थान कुठलं द्यावं यावर वाद होऊ शकतो. जळगाव जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय संघर्ष आहे. त्यात मराठा समाजाच्या नेत्यांना खडसे पक्षात किती चालतील हा देखील मोठा प्रश्न आहे.

आज शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची गट्टी जमली. कोण कुठल्या पक्षात घ्यावं याविषयी तिन्ही पक्ष एक मताने अजून तरी निर्णय घेत आहेत. खडसे राष्ट्रवादीमध्ये येणार असतील तर मोठा विरोध शिवसेनेचा असेल. भाजप सेना युती तोडल्याची नाराजी अजूनही सेना विसरू शकली नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीमध्ये खडसेंचा प्रवेश तूर्त होईल ही शक्यता धूसर आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधीच एकनाथ खडसे यांनी राजकीय भूकंपाची संधी गमावली का, अशी चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: September 28, 2020, 6:12 PM IST

ताज्या बातम्या