भाजपवर पलटवार करण्यासाठी शिवसेनेची नवी खेळी, बड्या नेत्याला पक्षात घेण्यासाठी हालचाली

भाजपवर पलटवार करण्यासाठी शिवसेनेची नवी खेळी, बड्या नेत्याला पक्षात घेण्यासाठी हालचाली

विधानसभा निवडणुकीआधी भाजपने नारायण राणे यांना पक्षात घेऊन शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

मुंबई, 6 डिसेंबर : गेल्या अनेक वर्षांपासून मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेत आता मात्र टोकाचं वितुष्ट आलं आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. विधानसभा निवडणुकीआधी भाजपने नारायण राणे यांना पक्षात घेऊन शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला. कारण नारायण राणे हे शिवसेनेचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यानंतर आता शिवसेनाही भाजपवर पलटवार करण्याच्या तयारीत आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या पक्षात नाराज आहेत. राज्यातून भाजपची सत्ता गेल्यानंतर तर एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जाहीर टीका सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात मेगाभरतीने राजकारणात भाजपने वादळ निर्माण केलं होतं. निवडणुकीच्या निकालानंतर सगळीच समीकरणं बदलली आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची गोची झालीय. तर भाजपमध्ये अस्वस्थ असलेल्या नेत्यांनी पक्षनेतृत्वाविरुद्ध बंडाचं निशाण फडकवलं आहे. या सगळ्या असंतुष्टांचं नेतृत्व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे आलंय.

एकनाथ खडसेंची ही अस्वस्थता गेल्या चार वर्षांपासून असून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न शिवसेनेने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. खडसे हे भाजपचे दिग्गज नेते असून गेली 40 वर्ष त्यांनी महाराष्ट्रात भाजप रुजविण्यासाठी मेहनत घेतली. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाने मुख्यमंत्रिपदाची माळ ही देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात घातली.

प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी नेत्यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आपण एकत्र यायला हवं अशी भूमिका मांडल्याचं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे.

'भाजपमध्ये वर्षानुवर्ष ओबीसी नेत्यांवर अन्याय होत आहे. आता हे थांबवण्यासाठी आम्ही एकनाथ खडसे यांची भेट घेतली. तसचं याकरता इतर भाजपच्या नेत्यांची पण भेट घेणार आहे,' असं प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे आज जे नेते शेंडगे यांच्या सोबत खडसे यांच्या भेटीला गेले होते त्यापैकी एकही जण भाजपचा सदस्य नाही. स्वत: प्रकाश शेंडगे हे सध्या शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे इतर नाराज भाजप नेतेही शिवसेनेसोबत जाण्याचा विचार करत आहेत का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

शिवसेनेनंही एकनाथ खडसे यांना पक्षात घेता येऊ शकतं का, याबाबत चाचपणी सुरू केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपला शह देण्याची संधी शिवसेना सोडणार नसल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण खडसे यांनी पक्षबदलाचा निर्णय घेतल्यास महाराष्ट्रात अनेक राजकीय समीकरणं बदलू शकतात.

First published: December 6, 2019, 12:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading