Home /News /maharashtra /

तारीख ठरली! भाजपला धक्का देत अनेक नेत्यांसह खडसेंची लवकरच राष्ट्रवादीत एंट्री?

तारीख ठरली! भाजपला धक्का देत अनेक नेत्यांसह खडसेंची लवकरच राष्ट्रवादीत एंट्री?

एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमध्ये याबाबत बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे आणि खडसे यांचे समर्थक उपस्थितीत होते.

    धुळे, 14 ऑक्टोबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लवकरच भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा जवळपास निश्चित समजला जात आहे. एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील अनेक आजी-माजी आमदार आणि कार्यकर्ते हे राष्ट्रवादी प्रवेश करण्याची शक्यता आहे. दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमध्ये याबाबत बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे आणि खडसे  यांचे समर्थक उपस्थितीत होते. या बैठकीत पुढील आठवड्यात राष्ट्रवादीत प्रवेश करायचा असं ठरल्याची शक्यता आहे. धुळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी याबद्दल तशी माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीत शरद पाटील यांनी सेनेचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला होता. गेल्या काही महिन्यांपासून पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती. एकनाथ खडसे यांच्यासह आपण लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहोत, अशी माहिती पाटील यांनी दिली. दरम्यान, भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी जामनेरमध्ये हजर होते. ग्लोबल हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्ताने एकनाथ खडसे आणि फडणवीस हे एकाच व्यासपीठावर येणार होते. परंतु, एकनाथ खडसे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. त्यांच्या ऐवजी खासदार रक्षा खडसे या कार्यक्रमाला हजर होत्या. खडसे यांच्या गैरहजरीमुळे राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे. एकनाथ खडसे योग्य निर्णय घेतील - फडणवीस परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी मात्र, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर सूचक प्रतिक्रिया दिली. 'एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे. राजकारण कसे आहे, त्यांना चांगले माहिती आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे' अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. तसंच, 'एकनाथ खडसे यांच्यासोबत आज कोणतीही चर्चा झाली नाही. योग्यवेळी मी चर्चा करेल आणि मला पूर्ण विश्वास आहे की, खडसे हे योग्य निर्णय घेतील' असंही फडणवीस म्हणाले. एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत मिळणार मोठी जबाबदारी? विशेष म्हणजे, एकनाथ खडसे हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज आहे. अलीकडे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निवड न झाल्यामुळे खडसे कमालीचे दुखावले गेले होते. त्यामुळे आता  एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानला जात आहे. लवकरच खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबद्दल अधिकृत घोषणा केली जाणार  आहे. राष्ट्रवादीत प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांच्यावर पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे.  एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत कोण-कोण राष्ट्रवादीमध्ये येणार याची उत्सुकता लागली आहे.  खडसे यांच्या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्र मधील अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये दाखल होण्याचे संकेत मिळत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या