जळगाव, 17 ऑक्टोबर: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप करून चर्चेत आलेला 'इथिकल हॅकर' मनीष भंगाळे हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मनीष भंगाळेच्य मदतीनं जळगाव पोलिसांनी सुमारे 412 कोटी रुपयांच्या ऑनलाईन चोरीच्या प्रयत्न हाणून पाडला आहे.
जळगावच्या एका पत्रकारासह दोन तरुणांना मनीष भंगाळे याच्या मदतीनं अत्यंत अभ्यासपूर्ण तपास व चौकशी करुन सापळा रचून पोलिसांनी सायबर टोळीचा पर्दाफाश केला. हेमंत ईश्वरलाल पाटील (पत्रकार) (वय- 42, रा. भुरे मामलेदार प्लॉट, शिवाजीनगर) व बांधकाम ठेकेदार मोहसीन खान ईस्माईल खान (वय-35, रा.देवपूर, धुळे) अशी आरोपींची नावं आहेत. देशभरातील विविध ठिकाणच्या सात संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या शोधार्थ चार पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे.
हेही वाचा..जळगावात सायबर टोळीचा पर्दाफाश; 412 कोटींच्या चोरीचा प्रयत्न, पत्रकाराला बेड्या
आरोपींकडून त्याच्याकडून एटीएम कार्ड क्लोनींग करत एक हजार रूपये बँक खात्यातून काढले. त्यानंतर या टोळीचे स्वप्न मोठे झाले व त्यांनी एटीएम कार्ड क्लोन करून सुमारे 412 कोटी रूपये काढण्याचा प्लान आखला. परंतु मनीष भंगाळे याने पोलिसांशी संपर्क साधून सर्व हकीगत सांगितली. बँकेतून डाटा गोळा करून चोरीचा करण्याचा प्रयत्न होता. पोलिसांनी मनीषा भंगाळेला माफीचा साक्षीदार बनवत सापळा रचून जळगावातून दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 420,120 (ब) यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले. त्यांना 20 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
मनीष भंगाळे हा गुन्हेगार प्रवृत्तीचा व्यक्ती- एकनाथ खडसे
जळगाव पोलिसांनी 412 कोटीच्या लुटीचा डाव उधळला याबाबत त्यांचे अभिनंदन. परंतु मनीष भंगाळे हा गुन्हेगार प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. तो माफीचा साक्षीदार झाला म्हणून त्याचे पूर्वीचे सर्व गुन्हे माफ होत नाहीत. पोलिसांनी त्याच्या यापूर्वीच्या सर्व गुन्ह्याची माहिती पोलिसांनी काढली पाहिजे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर हाच मनीष भंगाळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर फिरायचा असेही खडसे यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा..महिलेनं 25 वेळा चाकूनं सपासर केला वार, पोलीस ठाण्यात फोन लावून सांगितलं..
दरम्यान, आरोपींकडून मिळालेल्या विविध बँक खातेदारांच्या डाटाचा रक्कमेचा विचार केला तरी अब्जावधीची रक्कम पोलिसांच्या सतर्कतेमुळे व वेळीच अभ्यासपूर्ण तपासामुळे चोरी होण्यापासून सुरक्षित राहिली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून बँकेचा डाटा खरच सुरक्षित आहे का? असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.
देशभरातील बिल्डर, उद्योगपती, राजकारणी, बड्या आसामींचे कोट्यवधी रुपये असलेल्या बँक खात्यांचे डिटेल्स चोरी झाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. या टोळीमधील आतापर्यंत नऊ संशयित पोलिसांना निष्पन्न झाले असून ते खान्देशासह इतर राज्यातील हेत. या टोळीमध्ये बँक अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे.