मुंबई, 4 डिसेंबर: विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीनं (Mahavikas Aaghadi)भाजपला (BJP) 'दे धक्का' देत जोरदार मुसंडी मारली आहे. विशेष म्हणजे पुणे (Pune) आणि नागपूरसारख्या (Nagpur) भाजपच्या बुरुजालाही सुरुंग लावत येथेही महाविकास आघाडीनं विजयाचा झेंडा रोवला आहे. असं असतानाही विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे.
नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही. शिवसेनेनं परभवाचं आत्मपरिक्षण करावं, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
हेही वाचा...मी विनोदी आहे की नाही ते जनता ठरवेल, चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांवर पलटवार
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपनं किमान एक जागा राखली. पण, शिवसेनेनेला भोपळाही फोडता आला नाही. शिवसेनेच्या हाती काहीही लागलं नाही. महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र आले. त्यामुळे त्यांच्या शक्तीचा अंदाज आम्हाला आला नाही, हे देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं. परंतु या निवडणुकीचा महाविकास आघाडीतील केवळ दोनच पक्षांना फायदा झाला. एका पक्षाला तर एकही जागा मिळाली. ज्या पक्षाचा राज्यात मुख्यमंत्री आहे त्याच पक्षाला अर्थात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही, ही बाब गंभीर आहे. शिवसेनेनं या पराभवाचं आत्मचिंतन करावं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
The results of Maharashtra Legislative Council polls are not as per our expectations. We were expecting more seats but won only one. We miscalculated the combined power of the three parties (Maha Vikas Aghadi): Devendra Fadnavis, BJP leader & former Maharashtra CM pic.twitter.com/KtzuS7OwQn
रोहित पवारांचा खोचक सल्ला...
दुसरीकडे, विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली असून भाजपचा धुव्वा उडवला. रोहित पवार यांनी भाजपवर सडकून टीकेची तोफ दागली आहे.
'भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे युवा नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची 'जागा' दाखवून दिली, असा टोला देखील रोहित पवार यांनी विरोधी पक्षाला लगावला आहे.
हेही वाचा...पुण्यात भाजपचा गड ढासळला, महाविकास आघाडीचे अरुण लाड यांचा दणदणीत विजय
भाजपचे म्हणवल्या जाणाऱ्या नागपूर, पुण्यासारख्या बुरुजालाही सुरुंग लावत येथे महाविकास आघाडीने विजयाचा झेंडा रोवला आहे. त्यामुळं आतातरी भाजपनं (@BJP4Maharashtra)नं खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिक काम करण्यास सुरुवात करायला हरकत नाही, अशा शब्दांत रोहित पवार यांनी खोचक सल्ला देखील दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.