पंढरपूर, 19 ऑक्टोबर : 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थिल्लरपणा करू नये. सरकार चालवयाला दम लागतो, तो त्यांच्यात नाही.' अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली आहे. केंद्र सरकारने राज्याचे पैसे दिले नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
अतिवृष्टी आणि महापूरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आज माढा आणि करमाळा दौऱ्यावर आले होते. पाहणी दरम्यान पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
'केंद्र सरकारने नेहमीच महाराष्ट्राला मदत केली आहे. आता लोकांना मदतीची गरज आहे, अशा वेळी केंद्राकडे मदतीकडे बोट दाखवण्याऐवजी त्यांनी हिम्मत असेल तर शेतकऱ्यांना मदत करावी. आम्ही सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची मदत जाहीर केली होती. केंद्राची मदत जेव्हा यायची तेव्हा येईल, मात्र आपण मदत करायला हवी, अशा भावनेतून आम्ही ती मदत केली होती,' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अजित पवारांच्या आरोपांचं खंडन
केंद्र सरकारने कर्ज काढून राज्याच्या जीएसटीचे पैसे दिले आहेत, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आरोपाचेही खंडन केले.
'राज्याने 50 हजार कोटी कर्ज घेतले आहेत. आणखी 70 हजार कोटी कर्ज काढण्याची राज्याकडे क्षमता आहे. कर्ज काढा पण शेतकऱ्यांना मदत करा. अजित पवार दिशाभूल करत आहेत,' असा आरोपही फडणवीस यांनी केला.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाहणी दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जहरी टीका केल्यानंतर आता सत्ताधारी पक्षांकडून कसं प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहावं लागेल.